टेस्टींग केंद्रांवर धोक्याची गर्दी
नाशिक : कोरोना टेस्ट करण्यासाठी डीजीपीनगर येथे व्यवस्था करण्यात आलेली असली तरी या ठिकाणी एकच परिचारिका ॲन्टीजेन टेस्टसाठी असल्याने तसेच नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने विलंब होत आहे. याशिवाय गर्दी वाढत जाऊन धोका अधिक वाढत असल्याचे बोलले जात आहे.
बेडसाठी नातेवाईकांची धावाधाव सुरूच
नाशिक : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना बेड्सची शोधाशोध करावी लागत आहे. सरकारी तसेच खासगी रूग्णालयांमध्येदेखील बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची घालमेल वाढली आहे. शहरात सर्वत्र आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा समोर आल्या असून नागरिक आरोग्यसेवेपासून वंचित आहेत.
रात्रीच्या सुमारास अवजड वाहतूक
नाशिक : टाकळी चौकातून आग्रा महामार्गाकडे वाहतूक वळविण्यात आलेली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने ट्रक चालक शक्यतो रात्रीचा प्रवास करीत असतात. त्यामुळे अलीकडे टाकळी चौकातून भलेमोठे ट्रक्स तसेच टँकर्स यांची वाहतूक वाढली आहे. भरवस्तीतून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे टाकळी चौक धोकादायक बनला आहे.
पालकांना बालकांच्या आजाराची चिंता
नाशिक : उन्हाची तीव्रता वाढल्याने लहान मुलांमध्ये देखील सर्दी, खोकला, ताप, घसादुखी असे प्रकार वाढीस लागले आहेत. या आजारामुळे पालकदेखील चिंतेत आले आहेत. सध्या कोरेानाचा प्रादुर्भाव वाढल्याने लहान मुलांचा बचाव करण्यासाठी पालकवर्गाची धावपळ होताना दिसत आहे.