सप्तशृंगगड : भाविकांची अपेक्षित गर्दी न झाल्याचा परिणाम
प्रवीण दोशी ।
वणी : सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सव काळात भाविकांची अपेक्षित गर्दी न झाल्याने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणारा व्यापारीवर्ग चिंतामग्न झाला असून, किराणा, हॉटेल्स, पूजेचे साहित्य, प्रसाद व तत्सम व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला आहे. कर्ज काढून व्यवसायात गुंतवणूक करणारे व्यावसायिक अडचणीत आले आहेत.सप्तशृंगगडावर सुमारे ३०० व्यावसायिक विविध प्रकारचे व्यवसाय करतात. यात किराणा, प्रसाद, पूजेचे साहित्य, खेळणी, पादत्राणे, साडी-चोळी, पैठणी, पेढे विक्रेते यांबरोबरच फोटो, विविध रंगांचे दोरे व तत्सम व्यावसायिक व किमान ५० खासगी हॉटेल्स व्यावसायिक नाश्ता-जेवणाबरोबर निवास व्यवस्थाही उपलब्ध करून देतात. उत्सवकाळात हे व्यावसायिक मोठी गुंतवणूक करतात. चैत्र यात्रोत्सव व नवरात्रोत्सव असे दोन उत्सव गडावर मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. उत्सवाचे स्वरूप व्यापक असल्यामुळे देशभरातील भाविक हजारोंच्या संख्येने गडावर हजेरी लावतात. स्वाभाविकत: भाविकांच्या हजेरीमुळे मोठी आर्थिक उलाढाल होते. चैत्रोत्सवापेक्षा नवरात्रोत्सवात भाविकांच्या गर्दीचा उच्चांक असतो. नेहमीप्रमाणे भाविक गडावर येतील व खरेदी करतील या हेतूने आम्ही केलेली गुंतवणूकही अंगावर पडली असून, भाविकांची संख्या रोडावल्याने घाऊक विक्रे त्यांकडून खरेदी केलेल्या मालाचे करायचे काय, असा प्रश्न उभा राहिल्याची माहिती व्यावसायिक ईश्वर कदम यांनी दिली.बॅँकांचे कर्ज अन् हातउसनवारीपंढरपूर येथून कुंकू, मालेगाव व धुळे येथून साड्या, नाशिक येथून पूजासाहित्य व प्रसाद, उस्मानाबाद जिल्ह्यातून पेढे, आंध्र प्रदेशातून आडत्यांच्या माध्यमातून नारळ व ठिकठिकाणांहून तत्सम खरेदीचे नियोजन व्यापारी आखतात. पैसे आगाऊ द्यावे लागतात. तद्नंतर माल देण्यात येतो. बँकांचे कर्ज व नातेगोते आणि परिचितांकडून हातउसनवार करून भांडवल उभे करणारे व्यावसायिक धास्तावले आहेत. मालाची विक्र ी अपेक्षित व समाधानकारक नाही व त्यामुळे चलन फिरले नाही. अशा स्थितीत गाडी रुळावर आणण्याचे आव्हान व्यावसायिकांसमोर आहे. दरम्यान, गुरुवारच्या कोजागरी पौर्णिमेकडे व्यावसायिकांचे आता लक्ष लागले आहे. परंतु यादिवशी कावडधारकांची गर्दी होत असल्याने तुलनात्मक भाविकवर्ग गडावर येत नाही. जे येतात ते दर्शन करून परततात. त्यामुळे या प्रणालीतही असमान स्थितीवर नियंत्रण आणणे आव्हानात्मक काम आहे.