सायखेडा : पसिरात श्रावणसरींनी खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. पावसाअभावी पिके सुकू लागली होती. दोन दिवसांपासून परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.निफाड तालुक्यातील ग्रामीण भागात आठ ते दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली. संततधार पावसामुळे परिसरातील पाझर तलाव, बंधारे ओसांडून वाहू लागले आहेत. या पाण्याचा पीकवाढीसाठी फायदा होणार असून, शेतकरी आनंदी झाला आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतीतील सोयाबीन, मका, भुईमूग, उडीद आदी पिके पावसाअभावी सुकू लागली होती. दुबार पेरणीचे संकट निर्माण होते की काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. एरंडगाव शिवारात जलस्त्रोत पावसामुळे झाले प्रवाहित एरंडगावी प्रदीर्घ काळाच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावल्याने शिवार ओलेचिंब झाले आहे. पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना वेग येणार आहे. नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. शेतकºयांनी खरिपातील बाजरी, सोयाबीन, मका, मूग, भुईमूग, कपाशीची लागवड केली होती. सुरू असलेल्या पावसाने या पिकांना संजीवनी मिळाली आहे. सध्या शिवार हिरवाईने नटला आहे. घंट्या-घुगंरांचा आवाज शेतशिवारात घुमू लागला आहे. सुगीचा हंगाम असल्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून घरी बसून असलेल्या मजूर वर्गाच्या हाताला काम मिळाले आहे. श्रावण महिना सुरू झाला आणि संततधारेला सुरुवात झाली. हा पाऊस पिकांसाठी वरदान ठरला आहे. पावसामुळे शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.----------------मृग नक्षत्रात पडलेला पावसावर शेतकºयांनी मका, सोयाबीन, उडीद, भुईमूग आदी पिकांच्या पेरण्या केल्या होत्या. पेरणीदरम्यान चांगला पाऊस झाल्याने उगवण उत्तम होती. मात्र अचानक पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतेत भर पडली होती. श्रावणसरींनी पिकांना जीवदान मिळाले आहे.- संदीप बागलशेतकरी, बागलवाडी
श्रावणसरी कोसळल्याने खरीप पिकांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 9:56 PM