धनंजय वाखारेनाशिक : चातुर्मासास प्रारंभ झालेला असताना यंदा श्रावण महिना अधिक आला आहे. येत्या मंगळवारपासून अधिक श्रावण मासास प्रारंभ होत आहे. यंदा दोन श्रावण मास असल्याने आठ श्रावणी सोमवार आले आहेत. परंतु, १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत नीज (शुद्ध) श्रावण महिना असल्याने याच महिन्यातील चार श्रावणी सोमवारचे उपवास करावेत, असे पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
दर तीन वर्षांत एकदा कोणता तरी महिना अधिकमास येतो. दर १९ वर्षांनी पुन्हा तोच महिना अधिकमास येतो, असा एक साधारण नियम आहे. यापूर्वी सन २००४ मध्ये अधिक श्रावण महिना आला होता. त्यानंतर शके १९६४ मध्ये १७ जुलै २०४२ ते १५ ऑगस्ट २०४२ या कालावधीत अधिक श्रावण मास आहे. मात्र, यानंतरचा अधिक महिना हा ज्येष्ठ असणार असून, शके १९४८ मध्ये १७ मे २०२६ ते १५ जून २०२६ दरम्यान हा अधिक ज्येष्ठ येईल. यावर्षी श्रावण अधिक असल्याने श्रावण मासात केली जाणारी सर्व वार - व्रते नीज मासात म्हणजेच १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२३ या कालावधीत करावीत, अधिक मासात करू नयेत.
अधिक श्रावण महिना १८ जुलै ते १६ ऑगस्टपर्यंत असून, त्यानंतर १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत नीज (शुद्ध) श्रावण महिना आहे. अमांत मास पद्धतीप्रमाणे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र या प्रदेशात श्रावण महिन्यातील सर्व व्रते, सोमवारचे उपवास, मंगळागौर पूजन आदी नीज श्रावण (शुद्ध) महिन्यात करावे. त्यामुळे महाराष्ट्रात श्रावणाचे आठ सोमवार नाहीत. त्यामुळे शुद्ध श्रावणात एक महिनाच श्रावणातील पूजा, व्रत करावे. - मोहनराव दाते, पंचांगकर्ते, सोलापूर