नाशिक : पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त शहरातील प्राचीन सोमेश्वर, कपालेश्वर या प्रमुख मंदिरांसह सर्वच शिवमंदिरांमध्ये सकाळपासून भाविकांची रेलचेल पहावयास मिळत आहे. श्रावणमासाला आरंभ झाला असून हा महिना सण-उत्सवांचा महिना म्हणून ओळखला जातो. आज पहिला श्रावणी सोमवार असल्यामुळे भाविकांनी मनोभावे शिवमंदीरात हजेरी लावून ‘जय भोले..., हर हर महादेव’चा गजर करत शिवपिंडीवर बेलाची पाने अर्पण क रत दर्शन घेतले. गंगापूर शिवारातील जुने प्राचीन सोमेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराचा परिसर उजळून निघाला असून भाविकांच्या गर्दीने मंदिर फुलले आहे. येथे स्वयंभू शिवलिंग असल्याची अख्यायिका आहे. गोदाकाठालगत असलेल्या या मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त आहे. भाविकांचे मोठे श्रध्दास्थान असून परिसर निसर्गरम्य असून उद्यान, बोटक्लब असल्याने तरुण-तरुणींसह भाविकांचा नेहमीच येथे राबता असतो. श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या परिसरात भाविकांची गर्दी वाढल्याने जणू जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मंदिरात दर्शनासाठी सकाळपासून भाविकांची पावले वळल्याने गाभाऱ्यापुढे रांगा लागल्या आहेत. सकाळी मंदिरात महाभिषेक करण्यात आला. येवल्याचे प्रांतधिकारी भीमराव दराडे तथा नाशिकचे महसूल उपआयुक्त दिलीप स्वामी यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. याप्रसंगी विश्वस्त भीमराव पाटील, बापूसाहेब गायकर, राहूल बर्वे, बाळासाहेब लांबे आदि उपस्थित होते. पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त मंदिर परिसरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.
‘त्र्यंबकेश्वर’लाही भाविकांची रीघनाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र बारा ज्योर्तिलिंगापैकी एक ज्योर्तिलिंग आहे. श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरही भाविकांच्या गर्दीने फुलला आहे. त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी येथील ऐतिहासिक पुरातन मंदीरात भाविकांची रीघ लागली आहे. सकाळी महापूजा, महाभिषेक मंदिरात करण्यात आला.राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या वतीने ‘श्रावणी त्र्यंबक यात्रा’ कॅच केली जात असून जादा बसेसचे नियोजन जुन्या सीबीएस स्थानकातून करण्यात आले आहे. सुमारे शंभर बस नाशिक-त्र्यंबक-नाशिक मार्गावर धावत आहेत. बसस्थानकावर भाविकांची त्र्यंबकेश्वर गाठण्यासाठी झुंबड उडाली आहे.