लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ पर्वकाळात केलेल्या नियोजनाची सर्वत्र चर्चा आहे. तिसऱ्या श्रावण सोमवारसाठी होणारी गर्दी पाहता सिंहस्थ पर्वणीचीच आठवण व्हावी किंबहुना श्रावणी सोमवारची गर्दी जास्तच असू शकेल यासाठी सर्व यंत्रणांनी मिळून तिसऱ्या श्रावण सोमवारचे नियोजन करून पाचही सोमवार आनंदाने शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. यांनी केले. स्वच्छ पाणी, शहरातील उपजिल्हा रुग्णालय, प्रदक्षिणा मार्गावरील आरोग्यपथके प्लॅस्टिकमुक्त वापर, पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. पोलीस बंदोबस्त तसेच कोणत्याही प्रकारे भाविकांची गैरसोय न होता बससेवा असावयास हवी. अशा पद्धतीने सर्वांनी एकमेकांच्या समन्वयाने नियोजन करून संपूर्ण श्रावणमास तसेच तिसरा श्रावणी सोमवार उत्साहात पार पाडावा, असे राधाकृष्णन यांनी सांगितले. गंगास्लॅब मोकळा करावा, त्र्यंबकेश्वर मंदिर, कुशावर्त तीर्थ, मेनरोड आदी सर्व रस्त्यांवरील अतिक्रमणमुक्त रस्ते असावेत. या बैठकीला ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे, प्रांताधिकारी राहुल पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी श्यामराव पाटील, तहसीलदार महेंद्र पवार, नगराध्यक्ष तृप्ती धारणे, उपनगराध्यक्ष अभिजित काण्णव, मुख्याधिकारी डॉ. चेतना मानुरे-केरुरे आदी उपस्थित होते. श्रीमती पटवर्धन यांनी हॉटेलातील खाद्य पदार्थांची तपासणी केली जाईल तर पाण्याची तपासणी आरोग्य विभागाने करावी. धान्य अन्नपदार्थात भेसळ आढळल्यास कडक कारवाई करण्यात येऊन परवाने रद्द केले जातील, तर वीज वितरणचे सहा. अभियंता किशोर सरनाईक यांनी श्रावण मानसात वीजपुरवठा खंडित होणार नाही याबाबत काळजी घ्यावी. कारण वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार घडतात. प्रदक्षिणा करताना शेतातील पिके तुडवू नका. पिकांचे नुकसान करू नका. प्लॅस्टिकचा वापर करू नका. असे फलक गंगाद्वार व ब्रह्मगिरीवर लावण्याचे आदेश वनविभागाला दिले. तसेच शहरात-देखील नगरपालिकेने ठिकठिकाणी सूचना फलक लावावे. आरोग्य पथके वाढविण्याचे आरोग्य विभागाला डॉ. भागवत लोंढे व ग्रामीणमध्ये डॉ. योगेश मोरे यांना सांगितले. यावेळी औषध साठा, रुग्णवाहिका यांचीही माहिती घेण्यात आली. या बैठकीसाठी गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, डॉ. भागवत लोंढे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे, एस.आर. पाटील, आर.आर. पांडे, श्रीमती एस.एस. पटवर्धन, उत्पादन शुल्क विभागाचे यू. आर. आव्हाड जिल्हा परिषद ल.पा.चे उपअभियंता बी.ए. साळुंखे, पी.पी. हिरे, आर.डी जगताप, वनपाल निवृत्ती कुंभार आदी उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकारी व सर्व अधिकाऱ्यांनी मंदिर परिसर, कुशावर्त तीर्थ, वाहनतळ आदी ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.