लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नागरिकांच्या मनात असलेली गुंडांची दहशत कमी व्हावी यासाठी नाशिक पोलिसांकडून संबंधित गुंडाचे प्राबल्य असलेल्या परिसरातून धिंड काढली जाते़ जाधव व वाघ खुनातील संशयित तसेच सराईत गुन्हेगार व्यंकटेश नानाजी मोरे ऊर्फ व्यंक्या याची शुक्रवारी (दि़ २१) शहराच्या विविध ठिकाणांहून धिंड काढण्यात आली़ शहरातील व्यापारी पेठेत हप्ता वसुलीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या व्यंक्याची पोलिसांनी धिंड काढल्याने नागरिकांमधील भीती दूर होण्यास मदत होणार असून, तक्रारदारांना बिनदिक्कतपणे पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे़सराईत गुन्हेगार व्यंकटेश मोरे याची रविवार कारंजा, मेनरोड, अशोकस्तंभ, सरकारवाडा, मल्हारखाण, कॉलेजरोड या ठिकाणी मोठी दहशत होती़ येथील व्यापाऱ्यांकडून हप्ता वसुली केली जात असल्याचीही चर्चा असून, भीतीपोटी हप्ता देणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मनातील भीती दूर करण्याचा पोलिसांचा प्रमुख उद्देश होता़ २७ मे २०१६ रोजी पंचवटी परिसरातील हनुमानवाडी येथील भेळविक्रेता सुनील वाघ खुनात व्यंकटेश मोरे हा प्रमुख संशयित होता़ मात्र, घटनेनंतर तो फरार झाला होता़
महाबळेश्वरच्या एका हॉटेलमध्ये आपल्या साथीदारांसह लपून बसलेला व्यंक्या पंचवटी पोलिसांच्या जवळपास वर्षभरानंतर हाती लागला़ पोलिसांच्या विशेष पथकाने त्याच्यासह त्याच्या चार साथीदारांना सापळा रचून अटक केली़ न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावलेल्या मोरेच्या ज्या-ज्या ठिकाणी दहशत आहे त्या ठिकाणच्या रहिवाशांकडे विचारपूस करण्यात आली़ तसेच तक्रारींसाठी थेट पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले़यावेळी पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त डॉ़ राजू भुजबळ, विजयकुमार चव्हाण, पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, निरीक्षक आनंद वाघ, सहायक निरीक्षक महेश इंगोले आदींसह पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता़ यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती़