चांदवड : नमोकार तीर्थ प्रणेता राष्ट्रसंत आचार्यश्री देवनंदी महाराज यांच्या प्रेरणेने मालेगाव येथील झुंबरलाल पहाडे यांनी दीक्षा ग्रहण केली होती. त्यानंतर श्री शुद्धात्म कीर्तिजी महाराज असे त्यांचे नामकरण झाले होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी अन्नत्याग करीत जैन सल्लेखनाव्रत धारण केले होते. बुधवारी (दि. ९) पहाटे त्यांना संथारामरण प्राप्त झाले. सकाळी त्यांच्या पार्थिवावर आचार्य श्री देवनंदजी गुरुदेव यांनी मंत्रोच्चार करीत व विधिपूर्वक अंत्यसंस्कार पार पाडले.
सर्वप्रथम शुद्धात्म महाराज यांची डोलीतून मिरवणूक काढण्यात आली. डोली व अंत्यसंस्कार कार्यक्रम करण्याचा मान ब्रह्मचारी वैशालीदीदी, महावीर पहाडे, अनिल पहाडे, नवीन पहाडे मालेगाव यांना मिळाला. शांतीधारा करण्याचा मान प्रकाश बिनायका परिवारास, तर चंदन अर्पण करण्याचा मान नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांना मिळाला. केशर अर्पण करण्याचा मान केसरबाई पहाडे यांना, पुष्पवृष्टी करण्याचा मान विपीन कासलीवाल, महावीर गंगवाल, पूनम संचेती यांना, तर पूर्ण सुगंधित कलशाचा मान तीर्थरक्षा कमिटीचे माजी अध्यक्ष प्रमोद कासलीवाल, संजय पापडीवाल, अनिल जमगे, मांगीतुंगीजी ट्रस्टचे अध्यक्ष सुमेर काला यांना मिळाला. अंत्यसंस्कार कार्यक्रमास नाशिक, धुळे, पुणे, नगर, औरंगाबाद, हैदराबाद, नांदेड, जळगाव येथील जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.