श्रीकपालेश्वर भक्त मंडळाची बैठक गंगाघाटावरील पुरोहित संघाच्या कार्यालयात झाली. या बैठकीत येत्या गुरुवारी महाशिवरात्र असल्याने कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढू नये यासाठी पोलीस प्रशासनाने बुधवार, गुरुवार व शुक्रवार असे सलग तीन दिवस भाविकांना दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला. या कालावधीत मंदिरात नित्यनियमाने पूजाविधी होणार असले तरी मात्र भाविकांना दर्शनापासून वंचित राहावे लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भक्त मंडळाची बैठक होऊन, शिवरात्रीला कपालेश्वर मंदिर बंद करू नये, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश द्यावा. महाशिवरात्रीला चार प्रहरी पूजा असते त्यात खंड पडू नये. अनलॉक कालावधीत जनजीवन पूर्वपदावर येत आहे. सर्वत्र बाजारपेठा, हॉटेल, मद्यालय सुरू आहे. मग देवालयांना निर्बंध कशासाठी लावले जात आहेत, असा सवाल करण्यात आला. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी केलेल्या नियमावलीचे सर्वत्र तंतोतंत पालन केले जाणार आहे. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी तरी भाविकांना दर्शनापासून वंचित ठेवू नये अशी चर्चा करण्यात येऊन यासंदर्भात पोलीस आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना श्रीकपालेश्वर भक्त मंडळातर्फे लेखी निवेदन सादर करण्यात येणार आहे.
बैठकीला पुरोहित संघ अध्यक्ष सतीश शुक्ल, गोदाप्रेमी सेवा समितीचे देवांग जानी, पुजारी अविनाश गाडे, अतुल शेवाळे, प्रभावती जगताप, आकांक्षा सातपुते आदींसह भक्त मंडळ उपस्थित होते.
इन्फो बॉक्स
भाविकांची अडवणूक करू नये
अनलॉकच्या काळात श्रीकपालेश्वर मंदिराचे तीन दिवसीय लॉकडाऊन करून महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्तांना आराध्य दैवतांच्या दर्शनापासून वंचित ठेवू नये. महाशिवरात्रीनिमित्ताने चार प्रहरी पूजा असतात, त्यात खंड पडू नये.
देवांग जानी,