सुरगाणा : आदिवासी समाजात वर्षानुवर्ष गरिबी आहे. पावसाळ्यात काम संपले की, कामाच्या शोधात बाहेरगावी जावे लागते. कुटुंबाच्या पालन-पोषणाकरिता घरदार सोडावे लागते. शहरात विवाह सोहळ्यात लाखो रुपये खर्च केले जातात. तेवढ्याच पैशात हजारो जोडप्यांचे विवाह पार पडतील. खर्च कमी करण्यासाठी आदिवासी समाजात सामुदायिक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी केले. सुरगाणा तालुक्यातील गुजरात राज्याच्या सीमेवरील हडकाईचोंड येथे स्वामी विवेकानंद बहुद्देशीय सेवाभावी संस्था व बिरसा मुंडा प्रतिष्ठान समिती यांनी आयोजित केलेल्या ५५१ आदिवासी जोडप्यांचा विवाह सोहळ्यात सावरा बोलत होते.यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार जिवा पांडू गावित, माउली धाम त्र्यंबकेश्वर रघुनाथ महाराज, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, आयोजक भरत भोये, वनवासी कल्याण आश्रमचे क्षेत्रीय मंत्री संजय कुलकर्णी, समीर चव्हाण, एन.डी. गावित, रामजी गावित, रमेश थोरात, सुरगाणा नगराध्यक्ष रंजना लहरे, सुरेश गवळी, रतन चौधरी, भरत कोल्हे, विजय कानडे, सदू गांगुर्डे, विजय कानडे, विजय पवार, रोशन पगारे, राहुल अहेर, धर्मेंद्र पगारिया, ललित चव्हाण, राहुल अहेर, राकेश शर्मा आदी उपस्थित होते. यावेळी गिरीश महाजन म्हणाले, आदिवासी समाज हा कष्टाळू आहे. गरीब आहे. लग्न, आजारपण हे टाळता येत नाहीत म्हणून खर्च कमी होण्याकरिता सर्वच समाजात सामुदायिक विवाह ही अत्यंत काळाची गरज बनली आहे. महामंडलेश्वर रघुनाथ महाराज यांनी प्रत्येक समाजाने आदिवासी समाजाकडून राष्ट्रीय एकात्मता शिकावी, आदिवासी म्हणजे आदि वंश हा वंश महादेवाचा आहे. या समाजाने विकासाकरिता कोणावरही अवलंबून राहता कामा नये, असे आवाहन केले. सोहळ्यात ५५१ हापूस आंब्याच्या कलमी रोपांचे वाटप वनविभागातर्फे करण्यात आले. सोहळ्यास गुजरात, डांग, धरमपूर, दादरा नगर हवेली, दिव दमण, बलसाड या भागातील पाच हजारांहून अधिक नागरिक उपस्थिती होते. यावेळी शांताराम महाले, सुभाष भोये, रमेश वाडेकर, विजय थविल, अजित सहारे, गुलाब पवार, ईश्वर भोये, रवि भोये, सादू भोये, वसंत पवार, उमेश पालवा, चंदू ठाकरे, दीपक पवार, दीपक मेघा, रमेश बागुल उपस्थित होते.
हडकाईचोंड येथे ५५१ जोडप्यांचे शुभमंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 1:10 AM