लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठांची गर्दी
नाशिक : शहरातील अनेक लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. लवकर नंबर लागावा, यासाठी अनेक नागरिक सकाळपासूनच केंद्रांवर रांगा लावतात. जोपर्यंत साठा आहे, तोपर्यंत लसीकरण केले जाते. मात्र, त्यानंतर उर्वरित नागरिकांना दुसऱ्या दिवशी येण्याचा सल्ला दिला जात असल्याने अनेकांना परत घरी जावे लागते.
वीकेंड लॉकडाऊनचा दरांवर परिणाम
नाशिक : वीकेंड लॉकडाऊनचा भाजीपाल्याच्या दरावर परिणाम होत आहे. अनेक व्यापारी शुक्रवारी मोजकाच माल खरेदी करत असल्याने भाजीपाल्याचे दर कोसळतात. सोमवारनंतर मात्र पुन्हा दर सावरतात, अशी सध्याची स्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांना मात्र आर्थिक नुकसान सहन करावे लागते.
डिझेलमुळे ग्रामीण भागात दरवाढ
नाशिक : डिझेलचे दर वाढल्याने ग्रामीण भागातील ट्रॅक्टर चालकांनी नांगरणी, वखरणीचे दर मोठ्या प्रमाणात वाढविले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. अनेक शेतकरी शेतीची नांगरणी, वखरणी ही कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने करत असतात.
पाणी जपून वापरण्याचे आवाहन
नाशिक : पावसाळा अजून महिना दीड महिना लांब असून, धरणातील पाणीसाठी अल्प प्रमाणात शिल्लक असल्याने, नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हयाच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी
नाशिक : शहरातील अनेक रुग्णालयांना अद्याप ऑक्सिजनचा पुरेसा पुरठा होत नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांचा जीव टांगणीला लागला आहे. राज्य शासनाने सर्व रुग्णालयांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
दुकानाचे भाडे भरण्याचा प्रश्न
नाशिक : मागील महिनाभरापासून सलून, ब्युटी पार्लर बंद असल्याने, या व्यावसायिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आगामी काळात लाइटबिल, दुकानाचे भाडे कसे भरायचे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अनेक कारागिरांना उदरनिर्वाहासाठी पर्यायी रोजगार शोधावा लागला आहे.
पर्यटकांची संख्या मंदावली
नाशिक : गोदाघाटावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या पूर्णपणे मंदावली असल्याने, या परिसरात व्यवसाय करणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे व्यवसाय बंद झाले आहेत. अनेकांना रोजचा रोजगार मिळत नसल्याने, त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. धार्मिक विधी करण्यासाठी येणारे नागरिकही कमी झाले आहेत.
भाजी विक्रेत्यांच्या संख्येवर परिणाम
नाशिक : बाजार समितीमध्ये किरकाेळ विक्रेत्यांना प्रवेश बंद केल्याने, शहरातील भाजी विक्रेत्यांच्या संख्येवर त्याचा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे नव्यानेच भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांना माल भरणेही कठीण झाले आहे. यामुळे अनेकांना हा व्यवसायही बंद करावा लागतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आता नेमके करावे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.