नाशिक : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सोमवारी (दि. १६) शहरातील अंगणवाड्या, शाळा व महाविद्यालये बंद ठेवून राज्य शासनाच्या आदेशाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोमवारी शहरातील विविध शैक्षणिक संकुलांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. शालेय स्तरावरील काही विद्यार्थ्यांना शासनाच्या आदेशाची माहितीच नसल्याने असे विद्यार्थी शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले. मात्र शाळा व्यावस्थापनांकडून प्रवेशद्वारावर लावलेली सूचना पाहून सर्व विद्यार्थी माघारी परतले. शहरातील सर्व शाळांमध्ये आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शुकशुकाट दिसून आला. महापालिकेच्या ९० प्राथमिक व १३ माध्यमिक शाळांसह खासगी व विनाअनुदानित १७२ अशा सर्व २७५ शाळांनी प्रवेशद्वारावरच सुटी असल्याचे फलक लावले होते. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय शनिवारी (दि. १४) सायंकाळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारची सुटी असल्याने शाळा प्रशासन विद्यार्थी व पालकांना याबाबत सूचना देऊ शकले नव्हते. त्यामुळे या आदेशाविषयी अनभिज्ञ पालक सोमवारी सकाळी त्यांच्या घेऊन शाळेत आले. शाळा बंद अशल्याची माहिती मिळताच ते माघारी परतले. शैक्षणिक संस्थांनी एसएमएस, ई-मेल, व्हॉट््सअॅप व इतर सोशल माध्यमांद्वारे पालक व विद्यार्थ्यांना शाळा बंद राहणार असल्याची माहिती विद्यार्थी, पालकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला असतानाही काही पालक आणि विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन याबाबत शहानिशा करून घेतली. दरम्यान, शाळा, महाविद्यालयांना सुटी दिली असली तरी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सुरक्षारक्षकांना सुटी देण्यात आलेली नसल्याने शाळांचे शिक्षणेत्तर सर्व कामकाज नियमितपणे सुरू होते.
विद्यापीठांच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगितकोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यातील शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यशासनाने १७ ते ३१ मार्च दरम्यान विद्यापीठांच्या होणाऱ्या सर्व लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा स्थगित करण्याचे आदेश सोमवारी दिले. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने याबाबतचे परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना सूचित करतानाच १ एप्रिल २०२० पासूनच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यातील साडेपाच हजार महाविद्यालयांमधील सुमारे २७ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.