नाशिक : पालघरच्या आदिवासी महिलेची नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी पहाटे डिलिव्हरी झाली असून, या महिलेेने सयामी जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. मात्र केवळ छातीपासून वरचा भाग दोन आणि डोके दोन असून, पोटापासून सारे अवयव एका बाळासारखे आहेत. नाशिकमध्ये सयामी जुळ्यांना विलग करणे शक्य नसल्याने जिल्हा रुग्णालयाच्या वतीने बाळांना मुंबईला नेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यातील एका आदिवासी महिलेला झालेल्या या बाळाच्या विचित्र अवस्थेमुळे तिच्या कुटुंबीयांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पालघरच्या जिल्हा रुग्णालयात बाळाच्या सोनोग्राफीत काही नीटसे समजले नव्हते. मात्र, त्यांनी महिलेला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्या महिलेसह तिचे वडील दोन दिवसांपूर्वीच नाशिकला आले. त्यानंतर सिझेरिअन करून डिलिव्हरी करण्यात आली. मात्र, बाळाचा जन्म अशा अवस्थेत झाल्याने बाळाची माता तसेच महिलेचे वडीलदेखील घाबरून गेले. बाळाला इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आले आहे. गुजरातमध्ये कामाला असलेले बाळाचे वडील शुक्रवारी सकाळी नाशकात आल्यापासून त्यांना बाळाला पहायलादेखील मिळालेले नसल्याने त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. त्यात नाशिकला बाळांना विलग करणे शक्य नसल्याचे सांगण्यात आल्याने बाळांना घेऊन मुंबईला जायचे का ? गेले तरी त्यातील एकच जीवंत राहू शकणार, दुसरे जगण्याची शक्यतादेखील अत्यल्प असल्याने काय करावे, असा प्रश्न त्या पित्याला पडला आहे. मात्र, अत्यल्प असली तरी एक बाळ वाचण्याची शक्यता असल्याने मुंबईला नेण्याचा सल्ला त्या पित्याला देण्यात आला आहे.
इन्फो
त्यांना मुंबईला जाण्याचा सल्ला
अत्यल्प शक्यता असली तरी या सयामी जुळ्यांपैकी एक बाळ जगू शकेल असे वाटते.मुंबईला बोलणे झाले आहे, मात्र या कुटुंबाने थोडा पुढाकार घेऊन बाळ तिकडे नेणे आवश्यक आहे.
डॉ. पंकज गाजरे, जिल्हा रुग्णालय
फोटो
१२सयामी जुळे