एकलहरे : येथील सिद्धार्थनगर झोपडपट्टी समस्यांचे आगार बनले आहे. नाशिक औष्णिक वीज केंद्राच्या स्थापनेनंतर हळूहळू रोजगारासाठी आलेल्यांना ग्रामपंचायतीतर्फे प्राथमिक सुविधा पुरविण्यात आल्या. वसाहत दिवसेंदिवस वाढत जाऊन एकलहरे ग्रामपंचायतीचा प्रभाग क्रमांक एक म्हणून या झोपडपट्टीची ओळख निर्माण झाली.येथील नागरिकांना वीज, पाणी, स्वच्छताग्रह, समाजमंदिर, आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. कालांतराने येथे सिद्धार्थनगर, इंदिरानगर, साठेनगर, पहाडीबाबानगर, देशमुखवाडी, हनुमाननगर, कन्नडवाडी आदी छोट्या मोठ्या वस्त्या निर्माण झाल्या. एकलहरे वीज केंद्राच्या राखेमुळे अनेक व्यावसायिकांनी आपला मोर्चा एकलहरेकडे वळविला. यानिमित्ताने किरणा, हॉटेल, भाजीपाला, रिक्षा व्यवसाय वाढला.व्यावसायिक स्पर्धेतून काही अवैध धंदे व त्यानिमित्ताने गुन्हेगारीतही वाढ झाली. देशी दारु दुकानाबरोबरच अवैध दारू विक्री अनेक ठिकाणी सुरु झाली. यामुळे गुन्हेगारी वाढली आहे़ त्यामुळे छेडछाडीच्या तसेच, भुरट्या चोऱ्यांचे प्रकार वाढल्याने या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत़त्यातच वाहतुकीची समस्या वाढली आहे़ एकलहरे वीज केंद्रातून राख वाहतूक करणारे काही ट्रकचालक सिद्धार्थनगर चौकातील गर्दीचा विचार न करता बिनदिक्कतपणे वाहन चालवितात. त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.येथील देशमुखवाडी परिसरात अनेक राखेच्या गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या राहतात. रस्त्यावर उभ्या असलेल्या या गाड्या अर्धा रस्ता व्यापून टाकतात. काही व्यावसायिक स्पर्धेतून, काही छेडछाडीतून, काही विनयभंगासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंदही पोलिसांकडे आहेत. देशी दारुचा सुळसुळाट झाल्याने अनेकांचे संसार उद््ध्वस्त झाले आहेत. पोलीस आयुक्तालय हद्दीतील झोपडपट्ट्यांसारखे आॅलआउट आॅपरेशन एकदा एकलहरे झोपडपट्टीत राबविण्याची गरज आहे, असे एका व्यावसायिकाने सांगितले.(उद्याच्या अंकातइंदिरानगर, गाळुंशी, गंगापूरगाव)एकलहरे परिसरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्यासाठी गावपातळीवर तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून काही वाद-विवाद सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. गंभीर स्वरु पाचे गुन्हे सोडले तर काही वाद आम्ही पोलीस प्रशासनाच्या मदतीने बाहेरच मिटविले जातात. एवढे करु नही सद्यस्थितीत एकलहरेत व विषेशत: झोपडपट्टीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढल्याने गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागात अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचा आदेश काढून सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे या ठिकाणी अवैध धंदे सर्रासपणे केले जात आहेत. पोलीस प्रशासनही त्याकडे दुर्लक्ष करत आहे.- मोहिनी जाधव, सरपंच, एकलहरे
सिद्धार्थनगर झोपडपट्टी बनले समस्यांचे आगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:23 AM