सिडको : एकीकडे सिडको परिसरात स्वाइन फ्लू व डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली असताना, दुसरीकडे मात्र सिडको भागातील बहुतांशाी खासगी भूखंड व मोकळ्या मैदानात तसेच रहिवासी भागात ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसत असल्याने महापालिकेने याबाबतही गांभीर्याने दखल घेण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता मनपाने सिडको भागात व्यापक स्वरूपात स्वच्छता मोहीम राबविण्याबरोबरच मलेरिया विभागाच्या वतीने औषध व धूर फवारणी करण्याची गरज आहे. तुळजाभवानी चौकात एकाच भागात पन्नासहून अधिक डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून, या घटनेनंतर मनपाने या भागात स्वच्छता तसेच धूर व औषध फवारणी केली असल्याने मनपाचे वरातीमागून घोडे अशीच गत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. यानंतर या भागात मनपाच्या आरोग्य विभागाच्या समितीनेही नागरिकांशी प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या पाठोपाठच आता सपना थिएटर, मंगलमूर्ती परिसर, वृंदावन कॉलनी, खोडे मळा, गायत्रीनगर या परिसरातही डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत वाढ झाली असून, वाढलेल्या गाजरगवतामुळे परिसरात डासांचे प्रमाणही प्रचंड वाढले असल्याचे दिसून येत आहे. या भागातील खासगी भूखंडांसह मोकळ्या जागा, उद्यान व रस्त्याच्या साइडपट्ट्या भागात मोठ्या प्रमाणात गाजरगवत वाढले असून, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकांना डेंग्यूसदृश आजाराबरोबरच साथीच्या आजाराची लागण झाली आहे. मनपाने याबाबत तातडीने दखल घेत याठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून मलेरिया विभागाच्या वतीने औषध व धूर फवारणी करणे गरजेचे आहे. धूर, औषध फवारणी नाही मनपाच्या वतीने धूर व औषध फवारणीसाठी मक्तेदारास लाखो रुपयांचा ठेका दिला जात असला, तरी या ठेकेदाराकडून याबाबत व्यवस्थित औषध व धूर फवारणी केली जाते का याबाबत कोणाचाही अंकुश नसून सदर ठेका हा सत्ताधारी पक्षाच्या व्यक्तीकडे असल्याचे बोलले जात आहे. यामुळे मक्तेदारही कोणास जुमानत नसल्याचे दिसून येत असले, तरी केवळ धूर व औषध फवारणी करीत असल्याच्या दिखाव्यामुळे मात्र नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने मनपाने याबाबत गांभीयाने दखल घेण्याची गरज आहे.
सिडकोत डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 12:03 AM