............................
शहरात शिवजयंतीची जोरदार तयारी
नाशिक : येत्या १९ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवाची शहरात जोरदार तयारी सुरू असून विविध संस्था संघटनांतर्फे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू असून यासाठी आर्थिक नियोजनही केले जात आहे.
..........
पाणपोईंमध्ये पाणीच नाही
नाशिक : महापालिकेतर्फे शहरातील विविध मार्गांवर उभारण्यात आलेल्या पाणपोईंची स्थिती असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. या पाणपोईंमध्ये पाणीच नसल्याने त्याचा नागरिकांना कोणताही उपयोग होत नाही. स्थानिक नगरसेवकांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. उन्हाळा सुरू झाल्याने महापालिकेने पाणपोईंमध्ये पाणी भरण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
..........
स्वच्छतागृहांची दुरवस्था
नाशिक : शहरातील काही ठिकाणच्या स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. अनेक स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे तेथे स्वच्छता होत नाही. यामुळे या परिसरातील रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
.................
रस्ता रुंदीकरणाची मागणी
नाशिक : अगर टाकळी मार्गे जेलरोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढू लागली आहे. हा रस्ता खूपच अरुंद असल्याने पायी चालणेही कठीण होते. या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी परिसरातील वाहनचालकांकडून होत आहे. वाहनांची गर्दी वाढल्याने या मार्गावर किरकोळ अपघातांची संख्याही वाढली आहे.
..........................
सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ
नाशिक : शहरात दिवसेंदिवस सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्य महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढले जाते. पोलिसांनी या चोरट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
.....................
साहित्य संमेलनासाठी संघटना लागल्या कामाला
नाशिक : शहरात होऊ घातलेले साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी विविध सांस्कृतिक संघटना कामाला लागल्या असून, त्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. यासंदर्भात संघटनांची बैठकही संपन्न झाली आहे. साहित्य संमेलनातील वेगवेळ्या जबाबदाऱ्यांचे वाटपही करण्यात आले असून, कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
..........................
त्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याची मागणी
नाशिक : कोरोना काळात भरती केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना महापालिकेने सेवेतून कमी केल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असल्याने महापालिकेने या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे, अशी मागणी विविध राजकीय पक्ष संघटनांकडून करण्यात येत आहे.