सिडको : सिडको भागात दहशत माजवलेल्या टिप्पर गँगने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली असून, सिडको परिसरात शनिवारी (दि. १५) टिप्पर गँगच्या दोन गुंडांनी दारू पिऊन धुडगूस घालत एका महिलेसह तिच्या मुलांना मारहाण व शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला. मात्र, याप्रकरणी अंबड पोलिसांनी नेहमीप्रमाणेच कारवाईला टाळाटाळ केल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर परिसरातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
सिडकोत शुक्रवारी रात्री अंकुश सायखेडे व संदीप घुसळे यांनी दारू पिऊन पीडित महिलेच्या मुलांना शिवीगाळ केली. त्यानंतर शनिवारी दुपारी या दोघांसह त्यांच्या इतर मित्रांनी महिलेच्या घरी जात पुन्हा महिलेच्या मुलांना व महिलेला मारहाण करत त्यांचे कपडे फाडले व शिवीगाळ केली. तसेच महिलेसह तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी महिलेने अंबड पोलीस ठाण्यात येत तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीऐवजी मुलाची किरकोळ तक्रार दाखल करून घेतली. तसेच संशयित आरोपींवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. विशेष म्हणजे अंबड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल होत असताना, त्यावर योग्य ती कारवाई होत नसल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
इन्फो -
गुंडांचा उपद्रव वाढला
सिडको परिसरात टिप्पर गँगचे गुंड कोणत्या ना कोणत्या कारणातून नागरिकांमध्ये दहशत माजविण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना घाबरून नागरिक ना पोलिसांत तक्रार देत ना त्यांच्याविरोधात बोलत. अशा परिस्थितीत पोलिसांकडून अशा गुन्हेगारी वृत्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सिडको परिसरात गुंडांचा उपद्रव वाढला असून, सर्वसामान्य नागरिकांना या गुंडांचा त्रास सहन करावा लागत आहे.