मंदिर खुली करण्याची मागणी
नाशिक : निर्बंध शिथिल झाले असले तरी अद्याप मंदिर बंद असल्यामुळे फुल विक्रेत्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. फूल बाजारावरही याचा परिणाम झाला असून, शासनाने मंदिरं खुली करावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.
बस थांब्यांमध्ये वाढले गवत
नाशिक : शहर बस वाहतूक सेवा बंद असल्यामुळे बस थांब्यांवर प्रवाशांचा वावर कमी झाला आहे. यामुळे अनेक बस थांब्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून, बाकांचीही दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी तर किरकोळ विक्रेत्यांनी चक्क या बस थांब्यांमध्येच दुकाने थाटली असल्याचे दिसून येत आहे.
फळांचे दर वाढले
नाशिक : नाशिक बाजार समितीमध्ये फळांची आवक कमी झाल्याने फळांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सफरचंदाची आवक दररोज होत नाही. यामुळे घाउक बाजारात सफरचंद सरासरी १५० रुपये किलो दराने विकली जात आहेत. किरकोळ बाजारात यापेक्षा अधिक दर आहेत.
शेतकऱ्यांबरोबरच खत विक्रेतेही चिंतित
नाशिक : पाऊस लांबल्याने जिल्ह्यात अद्याप खतांना हवा तसा उठाव सुरू झालेला नाही. काही शेतकऱ्यांनी पेरणीबरोबरच खत टाकले आहे; मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने त्यांचेही धाबे दणाणले आहे. यामुळे खत विक्रेतेही चिंतित झाले असून, मोठ्या प्रमाणात भरलेला माल विकणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
अवैध धंद्यांना ऊत
नाशिक : उपनगर परिसरात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. यामुळे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. पोलिसांचे या धंद्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने व्यावसायिकांना बळ मिळत असल्याची चर्चा होत असून, पोलिसांनी याबाबत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची कसरत
नाशिक : पीक कर्ज मिळविण्यासाठी अनेक शेतकरी राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये चकरा मारत आहेत. या बँकांच्या जाचक अटींमुळे कागदपत्रे गोळा करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे पीक कर्ज केव्हा मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
चार नंतरही दुकाने सुरू
नाशिक : सायंकाळी चार नंतर दुकाने बंद होत असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट पसरतो. काही परिसरात मात्र चार नंतरही दुकाने सुरू रहात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. दुकाने सुरू रहात असल्याने या परिसरात गर्दी होते, यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.