नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे शिवारातील नाशिक - पुणे रस्त्यालगत असलेल्या कोलथाडवाडी भागात सोमवारी सायंकाळी शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले. वन्य प्राणी दिवसाही पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसत आहे. भोजापूर खोरे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून दिवसाही बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. परिसरातील कोलथाडवाडी भागातील दक्षिणेच्या बाजूला डोंगराळ भाग तसेच वन जंगल आहे. वृक्षाचे प्रमाण जास्त असल्याने या भागात वन्यप्राण्यांना लपण्यासाठी पुरेशी जागा आहे. नांदूरशिंगोटे परिसरात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे जंगली प्राण्यांना जंगलात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने जंगलातील मोर, बिबटे, तरस, लांडगे आदी वन्य प्राणी दिवसाही पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसत आहे. शेतकरी दिवसभर शेतात काम करतांना आपला जीव मुठीत धरून काम करतात. या परिसरात नेहमीच बिबटयाचा वावर असतो. बिबटेही दिवसा या भागात पाण्याच्या शोधार्थ भटकंती करतांना दिसत आहे. या भागात शेतमजूर कामासाठी जाण्यासाठी धजावत नाही. उन्हाच्या तीव्रतेने बिबटे जंगला बाहेर येत आहे. कोलथाडवाडी भागात सोमवार (दि.१२) रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास डोंगराच्या भागातून नाशिक - पुणे हायवे क्रॉस करत बिबट्या वस्तीकडे जात होता. त्याच दरम्यान या भागात राहणारे संजय संतू शेळके व महादू शेळके यांना बिबट्या दिसला. त्यानतंर बिबट्याने डाळींबाच्या बागेत गेल्याचे समजले. त्या भागातील शेतकºयांनी रात्री फटाके फोडून बिबट्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला. वनविभागाने या ठिकाणी पिंजरे लावून बिबटयाचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करत आहे.पाणवठे उभारण्याची गरजनांदूरशिंगोटेजवळील चास खिंड, नाशिक- पुणे महामार्गालगत डोंगराच्या पायथ्याशी वनजंगल आहे. त्याठिकाणी वनविभागाने वनतळे बनविले आहे. त्यामुळे त्याठिकाणी बिबटे व अन्य प्राणी पाणी पिण्यासाठी येथे येत असतात. मात्र, गेल्या वर्षापासून पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने वनतळे कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे बिबटे, मानवी वस्तीकडे पाण्याच्या शोधार्थ येत आहे. डोंगराळ भागात बिबटे व वन्य प्राण्यांना पिण्यासाठी ठिक-ठिकाणी पाणवटे उभारले तर दिवसाढवळ्या बिबटे मानवी वस्तीकडे चाल करणार नाही. बिबट्यासाठी पाणवटे उभारण्याची मागणी होत आहे.
नांदूरशिंगोटे परिसरात बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 2:38 PM