देवळाली कॅम्प : लहवितला शेतकºयांना बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वीच रात्री ज्ञानेश्वर काळे यांच्या पाळीव कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज अचानक बंद झाला. त्यामुळे काळे कुटुंबीय खिडकीतून कुत्रे का भुंकत नाही हे बघत असताना त्यांना बिबट्या कुत्र्याला मारून घेऊन जाताना दिसला. विष्णुपंत काळे हे नातवाला घेऊन लहवितला जात असताना त्यांना रस्त्यातच बिबट्याने ठाण मांडल्याचे दिसले. यासह अनेक शेतकºयांना व ग्रामस्थांना गेल्या दोन-चार दिवसांत बिबट्याचे दर्शन झाले आहे. लहवितलगत लष्कराचा रेंज परिसर जंगल असल्याने या ठिकाणी बिबट्याचे वास्तव्य नेहमीच राहाते. मात्र आता लहवित गावाजवळील मळे परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्याने सायंकाळनंतर मळेकºयांनी लहवित गावात येणे-जाणे बंद केले आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे व घबराटीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या दर्शनामुळे शेतकºयांवर आपली जनावरे गोठ्यामध्ये किंवा घरात सायंकाळनंतर बांधण्याची वेळ आली आहे. लहवित भागात काही ग्रामस्थांनी बघितलेला बिबट्या नसून पट्ट्याचा वाघ असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी विष्णुपंत काळे, ज्ञानेश्वर काळे, संपत राऊत, अरुण गायकवाड, सीताराम गायकर, संजय आहेर, मधुकर गायकवाड आदींनी केली आहे.
लहवित गावाजवळ बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:38 AM