नाशिक : महापालिका महासभेने मिळकत करामध्ये ३३ ते ८२ टक्क्यांपर्यंत दरवाढ केल्याने त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. भारतीय विद्यार्थी सेनेने महापौरांच्या ‘रामायण’ या शासकीय निवासस्थानासमोरच घरपट्टीची होळी करत निषेध नोंदविला, तर कॉँग्रेस-राष्टÑवादीसह मनसेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. करवाढीविरोधात वाढते जनमत लक्षात घेता सत्ताधारी भाजपाकडून आता बॅकफूटवर येण्याचे संकेत मिळत असून, वाणिज्यिक आणि औद्योगिक दर ‘जैसे थे’ ठेवत निवासी मिळकत कराच्या टक्केवारीत घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मंगळवारी (दि. २०) झालेल्या महासभेत महापौरांनी आयुक्तांनी ठेवलेल्या करवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देतानाच भांडवली मूल्याऐवजी भाडेमूल्यावर आधारित करवाढीस मान्यता दिली. त्यामुळे, निवासी घरपट्टीत ३३ टक्के, अनिवासीमध्ये ६४ टक्के तर औद्योगिकमध्ये ८२ टक्के दरवाढ होणार आहे. सदर दरवाढीस सभागृहातच शिवसेनेसह कॉँगे्रस, राष्ट्रवादी, मनसे या पक्षांनी विरोध दर्शवत सभात्याग केला होता. दरवाढीच्या या निर्णयाचे पडसाद शहरात उमटण्यास सुरुवात झाली असून, सोशल मीडियावरही त्याबाबत विरोधाचा सूर निघत आहे. बुधवारी सकाळी भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने महापौरांच्या ‘रामायण’ निवासस्थानासमोर घरपट्टीची होळी करण्यात आली. व्यापारी व उद्योजकांमधूनही या दरवाढीविरोधात सूर उमटला. या करवाढीविरोधी तयार होत चाललेले जनमत लक्षात घेऊन सत्ताधारी भाजपा आता बॅकफूटवर येण्याचे संकेत मिळत आहेत. प्रामुख्याने, निवासी दर कमी करण्याची शक्यता असून, औद्योगिक आणि वाणिज्यिक दर मात्र ‘जैसे थे’ ठेवण्याची चिन्हे आहेत. निवासी दर कमी करून सामान्य माणसांना दिलासा दिला जाण्याची शक्यता भाजपाच्या सूत्रांनी बोलून दाखविली आहे. त्यानुसार, प्रशासनाकडून बुधवारी (दि. २१) महापौरांसह भाजपा पदाधिकाºयांनी माहिती जाणून घेतली.
भाजपा बॅकफूटवर येण्याचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 1:46 AM