नाशिक : द्वारका चौफुलीवरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी सिग्नलयंत्रणा कार्यान्वित करणे व सुरळीत चालविणे हाच एकमेव पर्याय असल्याचे मत महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी व्यक्त केले आहे. शिवाय, द्वारका चौफुलीवरील सर्कलचा आकारही कमी करण्याची गरज असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.द्वारका चौफुलीवरील वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून पोलीस आयुक्तालयाने ‘यू-टर्न’ची योजना पुढे आणली होती. त्यानुसार, सोमवारी (दि.९) प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक वळविण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला. परंतु, दोन तासांतच ही योजना गुंडाळण्याची नामुष्की पोलिसांपुढे ओढवली. द्वारका चौफुलीवरील वाहतूक कोंडीवर उपाययोजनेबाबत महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, द्वारका चौफुलीवर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे हाच एकमेव पर्याय आहे. चौफुलीवर सिग्नल यंत्रणेचे व्यवस्थापन नीटपणे हाताळले आणि व्यवस्थित पोलिसिंग झाले, तर वाहतूक सुरळीत होण्यास बरीचशी मदत होईल. याशिवाय, द्वारका चौफुलीवरील सर्कलचा आकारही कमी करण्याची गरज आहे. मोठ्या सर्कलमुळे वाहतुकीला अडथळे उत्पन्न होतात. शहरात महापालिकेने जेहान सर्कल, अेबीबी सर्कलचे आकारमान कमी केल्याने वाहतुकीचा प्रश्न निकाली निघाल्याचेही आयुक्तांनी सांगितले. सिग्नल यंत्रणा ही अल्पकाळासाठी उपाययोजना होऊ शकेल, परंतु दीर्घकालीन उपाय म्हणून उड्डाणपुलाचाही विचार होऊ शकतो. दरम्यान, द्वारका चौफुलीवर सिग्नल यंत्रणा बसविण्याची जबाबदारी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणची (न्हाई) आहे. त्यांनी महापालिकेकडे प्रस्ताव दिल्यास सिग्नल यंत्रणा बसविण्यासाठी सहकार्य केले जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
द्वारका चौफुलीवर सिग्नल हाच पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:47 AM