--
नाशिक : शहर व परिसरातील महत्वाच्या चौकांमधील सिग्नल यंत्रणा अचानकपणे नादुरुस्त झाल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडतानाचे चित्र पहावयास मिळत आहे. काही सिग्नलचे सर्वच दिवे बंद तर काहींचे काही दिवे सुरु अन् काही नादुरुस्त अशी अवस्था पहावयास मिळत आहे. याबाबात पोलीस आणि महापालिका प्रशासानाकडून सिग्नल यंत्रणेच्या देखभालदुरुस्तीबाबत एकमेकांकडे बोट दाखविले जात आहे.
शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार करत सिग्नलचे नियंत्रण हे तंत्रज्ञांसह पोलीस प्रशासनाकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली होती; मात्र मनपा प्रशासनाकडून पत्राच्या मागणीनुसार केवळ सिग्नल नियंत्रण आणि व्यवस्थापन हे पोलीस प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आले. `मात्र ते नादुरुस्त झाल्यास दुरुस्त करण्यासाठी विद्युत विभाग किंवा त्याबाबतचे तंत्रज्ञ पोलिसांकडे उपलब्ध नाही, यामुळे तंत्रज्ञ पुरविण्याची मागणीही पोलिसांकडून मनपा प्रशासनाकडे करण्यात आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
शरणपूररोडवरील कॅनडा कॉर्नरवरील सिग्नल यंत्रणा मंगळवारी सकाळपासून नादुरुस्त झाल्याने वाहनचालकांची चांगलीच भंबेरी उडत आहे. नेमका कोणत्या बाजूचा दिवा हिरवा होतोय अन् कुठला लाल हेच कळेनासे झाले होते. त्यामुळे येथील सिग्नलप्रमाणेच वाहतुकीचेही संतुलन हरविल्याचे चित्र दिवसभर पहावयास मिळत होते. सिग्नल यंत्रणा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाकडे, असा प्रश्न नाशिककर उपस्थित करत आहेत.
रेडक्रॉस चौकातील सिग्नलचेही काही दिवे नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे रविवार कारंजाकडून नेहरू गार्डनकडे जाताना या मार्गावरील सिग्नल जेव्हा हिरवा होतो, तेव्हा दिवा प्रज्वलित होत नसल्याने नेमका सिग्नल चालू आहे, की बंद हेच वाहनचालकांना समजत नाही. पारिजातनगर येथील सिग्नल यंत्रणाही मागील दोन दिवसांपासून विस्कळीत झाली आहे. पारिजातनगरचा सिग्नल कधी चालू तर कधी बंद अशी स्थिती असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. तसेच गंजमाळ सिग्लचेही काही दिवे बंद राहत असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडालेला दिसून येतो. उंटवाडीरोडवरील सिग्नलदेखील कधी सुरु तर कधी बंद राहत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. यामुळे शहरातील सिग्नलला नेमका वाली कोण, असा सवाल संतप्त नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे.
---इन्फो--
सिग्नल दुरुस्तीबाबत दोन्ही यंत्रणा उदासीन
एकीकडे वाहनचालकांकडून सिग्नलचे पालन होत नसल्याची ओरड वाहतूक पोलिसांकडून होत असली तरी दुसरीकडे सिग्नल दुरुस्ती आणि नियंत्रणाविषयी मात्र मनपा व पोलीस प्रशासनाने कानावर हात ठेवल्याने नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील सर्व मुख्य चौकांमधील सिग्नलची तपासणी करण्याची गरज असून लवकरात लवकर शहरातील सिग्नल यंत्रणा सुरळीत कार्यान्वित करण्याची मागणी होत आहे.
---इन्फो--
शहरातील सिग्नल यंत्रणेचे व्यवस्थापन व नियंत्रण पोलिसांच्या मागणीवरुन त्यांना हस्तांतरित करण्यात आले आहे. यामुळे आता सिग्नलची देखभालीचीही जबाबदारी पोलिसांचीच असेल, असे महापािलका प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्याकडे विद्युत बिघाड दुर करणारे तंत्रज्ञ नसल्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात तंत्रज्ञ मनपाकडून पुरविले जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.