इंदिरानगर : वडाळा- पाथर्डी रस्त्यालगत असलेल्या नाशिक केम्ब्रिज स्कूलच्या व्यवस्थापनाच्या बेकायदेशीर नफेखोरीविरोधात शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचच्या वतीने स्वाक्षरी मोहीम शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ राबविण्यात आली. सदर निवेदन महापालिका प्रशासन अधिकारी शिक्षण मंडळ यांना देण्यात येणार आहे. नाशिक केम्ब्रिज स्कूल शाळेच्या वतीने यावर्षी बेकायदेशीर पुस्तक विक्री, बेकायदेशीर शुल्क व भरल्याने पालकांना वार्षिक निकल देण्यास नकार देणे आणि बालवाडीच्या मोठ्या गटातून पहिलीत प्रवेश घेणाऱ्या पाल्यांच्या पालकांकडून नोंदणी शुल्कच्या नावाखाली पंधराशे रुपये शुल्क वसूल करणे याबाबत निवेदनावर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे. शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयात झालेल्या विभागीय शुल्क विनिमय समितीच्या बैठकीस शाळेस पुस्तक विक्री करण्याबाबत स्पष्ट आदेश दिले होते. तरीही शाळा एका सक्षम अधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता बेकायदेशीर पुस्तक विक्री करत आहे. तसेच या शाळेतील गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी शिक्षणमंत्र्यांच्या आदेशानुसार राजभोर समितीची स्थापना झाली होती. त्या समितीच्या अहवालानुसार शाळेने पालकांकडून जास्तीची फी वसूल केल्याचे नमूद केले होते. शाळा व्यवस्थापनाकडून पालकांची अडवणूक व आडमुठेपणामुळे मानसिक त्रास होत आहे. त्यामुळे संतप्त पालकांनी स्वाक्षरी मोहीम राबविली. यावेळी मुकुंद दीक्षित, वासंती दीक्षित, योगेश पालवे, शेखर कुलकर्णी, संदीप पावटेकर पालकवर्गाच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिक्रीया)
शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचच्या वतीने स्वाक्षरी मोहीम
By admin | Published: March 07, 2017 1:53 AM