चांदोरी : यंदा उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने निफाड तालुक्यासह गोदाकाठ भागातील शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा बियाणे खरेदी करून मोठ्या प्रमाणात रोपे टाकली, मात्र परतीच्या पावसाने अनेकांच्या शेतातील रोपे वाहून गेली तर काही शेतात सडल्याने या वर्षी उन्हाळ कांदा उत्पादनात मोठी घट होण्याची चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान मका, सोयाबीन पिकांचे देखील पावसाने नुकसान झाले आहे. सोंगलेला व शेतात उभी असलेला मका सडल्याने जनावरांच्या चा-याचा प्रश्न देखील गंभीर होणार आहे.मागील उन्हाळ्यात पाणी टंचाईचे संकट गंभीर झाले होते. प्रारंभीच्या पावसाने साथ देत शेतक-यांनी मका,सोयाबीन, भाजीपाला,टोमॅटो आदी पिकांचे उत्पादन घेतले. मात्र ही पिके काढणीला येण्याची वेळ आणि परतीच्या पावसाची वेळ एकच झाली. सतत १५ दिवस बरसणा-या परतीच्या पावसाने द्राक्षबागांची पुरती वाट लावली. रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप आले होते. मका, सोयाबीन,भाजीपाला, टोमॅटो, ऊस आदी पिके सडली तर उन्हाळ कांदा रोपांना देखील परतीच्या पावसाचा फटका बसला . शेतात मोठया प्रमाणात पाणी साचल्याने हो रोपे सडली. त्यामुळे यावर्षी उन्हाळ कांदा उत्पादनात मोठी घट होण्याचे संकेत मिळत आहेत. जून महिन्यात प्रारंभी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला होता. सहाजिकच बँका, सोसायट्या, पतसंस्था व घरात असलेला माल, कांदा विकून नवीन पिके घेण्यासाठी भांडवल उभे केले. त्यासाठी मोठी मेहनत घेतली गेली. मात्र पीक हातात येण्याची अन परतीच्या पावसाची एक वेळ झाली. परिणामी शेतातील उभे पीक व काढून पडलेले पीक पूर्णत: सडले.प्रशासनाने आता या पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची मोहीम हाती घेतली असली तरी नुकसान भरपाई कधी व किती मिळेल, याची खात्री नाही. त्या मुळे शासनाने शेतक-यांचे संपूर्ण कर्ज माफ करून नव्याने पिके घेण्यासाठी शून्य टक्के व्याज दराने कर्ज पुरवठा करण्याची मागणी आता शेतकरी वर्ग करू लागला आहे.
यंदा कांदा उत्पादन घटण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 6:31 PM
अवकाळी पावसाचा फटका : चाऱ्याचाही प्रश्न गंभीर
ठळक मुद्देमका, सोयाबीन,भाजीपाला, टोमॅटो, ऊस आदी पिके सडली तर उन्हाळ कांदा रोपांना देखील परतीच्या पावसाचा फटका बसला