नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच खरीप हंगामातील तयार झालेली पिके काढण्यास पावसामुळे अडथळा निर्माण झाला असून, त्याचा परिणाम रब्बी हंगामाची पेरणी वर झाला आहे. त्यामुळे रब्बीची पेरणी लांबणीवर पडण्याचे चित्र परिसरासह तालुक्यात पाहावयास मिळत आहे.यावर्षी पावसाचे आगमन उशिराने झाल्याने खरीप हंगामातील पिकांची पेरण्यांनाही खऱ्या अर्थाने जुलैनंतर वेग आला होता. या हंगामात पेरलेली मका, सोयाबीन व बाजरी यासारखी पिके आता काढणीला आली आहे. नांदूरशिंगोटे परिसरात साधारणत: १३०० हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या विविध पिकांची पेरणी झाली आहे. यातील काही पिकांची सोंगणी झाली असून काही पिके अजूनही शेतात उभी आहेत.पावसाचे दिवस संपत आले तरी पावसाचा मुक्काम कायम आहे. त्यामुळे तयार झालेली पिके काढण्यास अडथळा निर्माण झाला आहे. अधूनमधून जोरदार पाऊस होत असल्याने शेतात पाणी साचले आहे. सध्या पिके काढता येणे शक्य नाही. खरीपाची पिके अजूनही शेतात उभी असल्याने रब्बी पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. नांदूरशिंगोटे परिसरात जवळपास एक हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पिकांचे उद्दिष्ट आहे. यावर्षी सर्वत्र पावसाचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्याने रब्बीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आजमितीस ज्वारी व हरभºयाच्या पेरणीला सुरुवात होणे आवश्यक होते. गव्हाची पेरणी थोडी उशिराने केली तरी चालणार आहे. या साºया पिकांच्या पेरण्यांसाठी आधी शेत तयार करावे लागणार असून, त्यासाठी खरिपाची पिके काढणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र हीच पिके शेतात उभी असल्याने शेत तयार करणार कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. जोपर्यंत वाफसा तयार होत नाही, तोपर्यंत पेरणी करता येणार नाही. येत्या दहा दिवसांत चांगल्या प्रमाणात ऊन पडले तर वाफसा होणार आहे. ही परिस्थिती पाहता रब्बीसाठी शेतकºयांना तूर्त तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
रब्बीच्या पेरण्या लांबणीवर पडण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 10:54 PM