नायगाव : यावर्षी भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जून महिना तोंडावर येवूनही खरीप हंगामाची पूर्व तयारी कोलमडून पडल्याचे चित्र नायगाव खोऱ्यात पहावयास मिळत आहे. तीव्र पाणी टंचाई व आर्थिक अडचणीमुळे खरीप हंगाम लांबण्याची चिन्हे दिसत असल्यामुळे शेतकरी वर्गात चिंता व्यक्त होत आहे.सलग गेल्या तीन वर्षापासून पर्जन्यमान घटत असल्याने तर यावर्षी अत्यल्प पडलेल्या पावसामुळे कधी नव्हे एवढी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सध्या नायगाव खोºयातील विहिरींनी तळ गाठले आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. खरीपाची पूर्व तयारीही कोलमडुन पडली आहे. जून महिना तोंडावर येवून ठेपला असतांनाही सर्वच शेती अजुनही मशागती विना पडुन असल्याचे चित्र नायगाव खोºयात बघावयास मिळत आहे. दरवर्षी मे महिन्याच्या सुरवातीपासून शेतकरी खरीपाच्या तयारीला लागत असतात. यंदा मात्र सर्वच विहिरी कोरड्याठाक असल्यामुळे तसेच उन्हाची तीव्रता अधिक असल्याने खरीपाच्या विविध रोपांची लागवड खोळंबली आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकरी खरीपाच्या हंगामातील पिकांची लागवडी बरोबर शेतीच्या मशागतीचे कामे हाती घेतात. यंदा मात्र तीव्र पाणी टंचाई असल्याने खरीपाच्या रोपांची लागवड करता येत नसल्याने जूनच्या प्रारंभी होणारी खरीपाची लागवड लांबणीवर जाणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांचा खरीप हंगाम बेभरोशाचा बनण्याचे चिन्ह दिसत आहे.
पाणी टंचाईमुळे खरीप लांबणीवर पडण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 5:40 PM