नाशिक : शहरात शीख बांधवांचा बैसाखी सण उत्साहात साजरा झाला. नानकशाही कालगणनेनुसार वैशाख महिन्याचा पहिला दिवस अर्थातच बैसाखी हा शीख आणि हिंदू संप्रदायाचा ऐतिहासिक आणि धार्मिक सण आहे.शीख संप्रदायाच्या इतिहासात या दिवसाचे औचित्यपूर्ण स्थान आहे. या दिवशी शीख संप्रदायाच्या नवीन वर्षाचाही शुभारंभ होतो. इ.स. १६९९ मध्ये गुरु गोविंद सिंग यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या खालसा पंथाचा हा स्थापना दिवस म्हणूनही ओळखला जातो. हा दिवस ‘‘खालसा सिरजाना दिवस’’ किंवा ‘‘खालसा सजना दिवस’’ या नावानेही प्रसिद्ध आहे. शिखांच्या दहाव्या गुरुंचे सत्तारूढ होणे आणि ऐतिहासिक खालसा पंथाची स्थापना होणे हे शीख बांधवांसाठी एक महत्त्व पूर्ण घटना होती.शहरात सर्व शीख बांधवांनी बैसाखी सण मोठ्या उत्साहात साजरा केला. या बैसाखीपासून ५५०व्या प्रकाश पुरब पर्वाचाही शुभारंभ करण्यात आला. शिंगाडा तलाव येथील गुरु द्वारात श्री गुरुग्रंथ साहिबचे अखंड पाठ व अन्य धार्मिक कार्यक्र म साजरे करण्यात आले तसेच लंगरदेखील आयोजित करण्यात आले होते. यावेळी अमृतसर येथील भाई गुरुजित सिंग यांची मुख्य उपस्थिती होती. रब्बी मोसमाचा योग्य काल म्हणूनही या दिवसाला महत्त्व आहे. वसंत ऋतूतील कापणीच्या हंगामाचा दिवस म्हणूनही या दिवसाचे महत्त्व आहे. म्हणूनच यावेळी विपूल अन्नधान्य तसेच सर्वांच्या सुख-शांतीसाठी विशेष प्रार्थना केली गेली. शहरातील तमाम शीख बांधवांनी बैसाखी सणाच्या शुभेच्छा देऊन गुरुद्वारामधील कार्यक्र मांना आपली उपस्थिती लावली. प्रकाश पर्वानिमित्त शहरातील प्रत्येक गुरु द्वारात दरमहा रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले जाणार आहे.
शीख बांधवांचा ‘बैसाखी’ उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 1:14 AM