पिंपळगाव बसवंत : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दि. २३ मेपर्यंत कडक निर्बंध लागू केले. त्यात सर्वाधिक गर्दी हाेणाऱ्या जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्याही बंद ठेवण्याचे आदेश दिले. मात्र, बाजार समित्यांना पर्यायी व्यवस्थेचे अधिकार देऊन समित्यांनी या बंद काळात थेट व्यापाऱ्यांच्या खळ्यांवर शेतमाल विक्री करण्यास मान्यता दिली. परंतु कांदा उत्पादक शेतकरी खळ्यांवर जाण्यास नापसंती दर्शवत असतानाच व्यापारीवर्गही पुरेशा मजुरांअभावी कांदा खरेदी करण्यास अनुत्सुक असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या बंदमुळे शेतकऱ्यांसह व्यापारीवर्गही अडचणीत सापडला आहे.
गेल्या मंगळवारी (दि.११) निर्बंध लागू होण्यापूर्वी पिंपळगाव बाजार समिती आवारात एकूण ६९ हजार ६२० किंटल आवक झाली. बंदच्या भीतीने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा बाजार समितीत लिलावासाठी आणला होता. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या खळ्यांवर अगोदरच मोठ्या प्रमाणावर कांद्याचे ढिगारे साचलेले आहेत. बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना संबंधित व्यापाऱ्याशी समन्वय साधून त्यांच्या खळ्यांवर कांदा विक्रीसाठी नेण्यास मान्यता दिली असून, त्याठिकाणी काटा पट्टीच्यावेळी बाजार समितीचे प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. परंतु गेल्या दोन दिवसांपासून व्यापाऱ्यांच्या खळ्यांवर तुरळक शेतकरीवगळता फारशी गर्दी दिसून आलेली नाही. जे शेतकरी गरजवंत आहेत आणि ज्यांना पैशांची अतिशय निकड आहे, तेच शेतकरी कांदा विक्रीसाठी आणत आहे. परंतु कवडीमोल भावात कोणी कांदा विक्रीसाठी पुढे येत नसल्याने व्यापाऱ्यांच्या खळ्यांवरही बाजार समित्यांच्या आवाराप्रमाणे सन्नाटा दिसून येत आहे. त्यातच व्यापाऱ्यांना मजुरांची टंचाई भासत आहे. कडक निर्बंधांमुळे अनेक परप्रांतीय मजूर आपल्या गावाकडे परतले आहेत. त्यामुळे माल भरण्यासाठी मजूर उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनाही मजूर मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे कुणीही व्यापारी अगोदरच भरमसाठ माल खळ्यांवर पडून असल्याने आणि अन्य प्रांतातही तो पाठविण्यात अडचणीचे ठरत असल्याने कांदा खरेदीसाठी उत्सुकता दाखवत नाही. याशिवाय, अनेक व्यापाऱ्यांनी यापूर्वी अन्य प्रांतात पाठविलेल्या मालाचेही पैसे संबंधितांकडे अडकल्याने व्यापारीही अडचणीत सापडला आहे. त्यात बँकांचे व्यवहार सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंतच ठेवल्याने व्यवहारातही अडथळे निर्माण होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.
इन्फो
खळ्यांवर साचले कांद्याचे ढिगारे
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत अंदाजे जवळपास पन्नास हजार क्विंटलच्या पुढे दररोजची आवक होत असते. गेल्या दहा ते बारा दिवसाची आवक बघितली तर पाच ते सहा लाख क्विंटल आवक ही या बाजार समितीत झालेली आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत मंगळवारी दि. ११ रोजी मोठ्या प्रमाणात आवक झाली. तो सर्व माल व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला आहे. परंतु मजूर, मापारी, हमाल मिळणे मुश्कील झाल्याने अजूनही मोठ्या प्रमाणावर माल खळ्यावरच पडून असून, मोठे मोठे कांद्याचे ढिगारे खळ्यावर पाहायला मिळत आहे.
इन्फो
थेट खळ्यावर जाणे तोट्याचेच
जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बाजार समित्या बंद करण्याचा निर्णय घेतला; मात्र शेतकऱ्यांनी खळ्यावर कांदा विक्रीस घेऊन जावा, असेदेखील सांगण्यात आले. मात्र परस्पर कांदा विक्री केला तर भावातही मोठी तफावत दिसून येईल व शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळणार नाही त्यामुळे थेट खळ्यांवर कांदा विक्रीस घेऊन जाणे म्हणजे तोटाच असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
कोट...
बाजार समितीच्या लिलाव आवारात कोणतीही गर्दी होत नाही. पूर्णपणे कोरोनाचे नियम पाळून लिलाव प्रक्रिया पार पडत असते तरीदेखील जिल्हा प्रशासनाने बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तो अत्यंत चुकीचा असून, यावर अवलंबून असलेल्या अनेक घटकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा.
भाऊसाहेब वाघ, कांदा उत्पादक
कोट....
बाजार समित्या बंद होणार असल्याचे समजताच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात एक दिवस अगोदरच कांदा विक्रीस आणला होता. तो सर्व व्यापाऱ्यांनी खरेदी केला. मात्र आता तोच कांदा खळ्यावर अजूनही तसाच पडून आहे. लॉकडाऊनच्या भीतीने मजूर, हमाल मिळत नसल्याने कांद्याचे लोडिंगदेखील थांबले आहे.
- योगेशकुमार ठक्कर, कांदा व्यापारी, पिंपळगाव बसवंत
............................................
निर्बंध लागू होण्यापूर्वीची आवक
दिनांक आवक (क्विंटलमध्ये) सरासरी भाव
दि. ६ मे --- ४७,८५० ------१४०१
दि. ७ मे --- ४७,३५० -----१४५१
दि.८ मे ---- २७,०००----१४५१
दि.१० मे----५२,९८०-----१४५१
दि.११ ------६९,६२०-----१४५१
फोटो- १४ ओनियन१/२/३
===Photopath===
140521\14nsk_30_14052021_13.jpg~140521\14nsk_31_14052021_13.jpg~140521\14nsk_33_14052021_13.jpg
===Caption===
फोटो- १४ ओनियन१/२/३~फोटो- १४ ओनियन१/२/३~फोटो- १४ ओनियन१/२/३