सिन्नर : कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथे विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी कोपरगाव पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यासह संशयित आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सिन्नरचे नागरिक, विवाहितेचे नातेवाईक, क्रांतिसूर्य प्रतिष्ठान व मित्रपरिवाराने सिन्नरच्या तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला.
आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी तहसीलदार राहुल कोताडे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. सिन्नर येथील माहेरवाशीण व शहरात राहणाऱ्या पांडुरंग रामभाऊ लोंढे यांच्या मुलीचे लग्न काही महिन्यांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील निखिल विलास मेहेत्रे याच्यासोबत झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून सिन्नरची माहेरवाशीण असलेल्या पूजाचा हुंड्यासाठी छळ केला जात असल्याची तक्रारी नातेवाइकांनी केली आहे. संसार टिकावा म्हणून पूजा अन्याय सहन करीत होती. २६ जुलै रोजी पूजाला तिचा पती व सासरचे अमानुषपणे मारहाण करीत तिला जिवंत जाळून टाकल्याचा आरोप तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. यात कोपरगाव पोलिसांचीही भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. मूक मोर्चाच्या वतीने सिन्नरच्या तहसील कार्यालयाच्या आवारात मागण्यांचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे यांना देण्यात आले. यावेळी क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, शिवसेना शहरप्रमुख गौरव घरटे, प्रहार संघटनेचे शरद शिंदे यांच्यासह नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिक उपस्थित होते.शिवसेना, भाजपचे निवेदनसिन्नरच्या माहेरवाशिणीच्या मृत्यूप्रकरणी सर्वच पक्षांसह विविध संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त करीत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. शिवसेना शहरप्रमुख गौरव घरटे, कार्यालय प्रमुख पिराजी पवार यांच्यासह शिवसैनिकांनी तहसीलदारांना निवेदन दिले. भाजपच्या कार्यकर्त्यांनीही थेट कोपरगाव पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करीत पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, सजन सांगळे, सचिन गोळेसर, विशाल क्षत्रिय, संतोष क्षत्रिय, सविता कोठूरकर, मंगला झगडे यांनी कोपरगावच्या पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी केली.