नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना मराठा आरक्षणावर भूमिका मांडण्यासाठी सोमवारी (दि. २१) सकाळी १० ते १ वाजेदरम्यान आंदोलनस्थळी निमंत्रित करण्यात आले असून आंदोलक शांततेत लोकप्रतिनिधींची भूमिका ऐकून घेणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी स्पष्ट केले आहे. आंदोलनात सहभागी आंदोलक काळ्या रंगाची वेशभूषा परिधान करून दंडावर काळी फीत बांधून, काळा मास्क, शक्य असेल त्यांनी भगवा ध्वज घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, परिसरात लावण्यात आलेल्या भगव्या झेंड्यांमुळे गंगापूर रोडला भगवी झालर प्राप्त झाली आहे.
इन्फो
प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन
आंदोलकांनी कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळावे, तसेेच आंदोलकांनी वाहनांची पार्किंग डोंगरे वसतिगृह मैदानावर करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आले आहे. आंदोलनस्थळी सकाळी ९ वाजेपासूनच आंदोलक उपस्थित राहणार असून छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला खासदार संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला प्रारंभ होणार आहे.