अभिनेत्री कंगनाच्या निषेधार्थ मूक आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 01:38 AM2021-11-19T01:38:08+5:302021-11-19T01:38:37+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशातील स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानींचा वारंवार अपमान करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणाैत हिच्या निषेधार्थ शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने मूक आंदोलन करण्यात आले.
नासिक : राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशातील स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानींचा वारंवार अपमान करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणाैत हिच्या निषेधार्थ शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने गांधीगिरी मार्गाने कंगना हिची प्रतिमा हातात घेऊन मूक आंदोलन करण्यात आले. देशाला भिकेत स्वातंत्र्य मिळाले, असे जाहीरपणे वक्तव्य करणाऱ्या कंगना रणाैत यांनी लागोपाठ वादग्रस्त विधाने केली. तिच्या या विधानाने देशासाठी जे स्वातंत्र्य सेनानी शहीद झाले त्यांचा अपमान केला जात असल्याने बुद्धीहीन कंगना रणाैत हिला सद्बुद्धी लाभावी, यासाठी गुरुवारी (दि. १८) सकाळी शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने गांधीगिरी मार्गाने गंगाकाठावरील गांधी ज्योत येथे मूक आंदोलन करून जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. ‘हे राम... कंगना रणाैतला सद्बुद्धी दे’ अशी विनंती आंदोलकांनी यावेळी केली. आंदोलनात शहर काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री शोभाताई बच्छाव, सेवादलाचे अध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर, गटनेते शाहू खैरे, प्रभाग सभापती वत्सला खैरे, संतोष ठाकूर, हनीफ बशीर, राजेंद्र बागुल, लक्ष्मण धोत्रे, सुरेश मारू, बबलू खैरे, उद्धव पवार, धोंडिराम बोडके, पोपटराव नागपुरे, सुनील आव्हाड, कल्पना पांडे, राजकुमार जेफ, अण्णा मोरे, मुकेश त्रिवेदी, अशोक लांडगे, सिद्धार्थ गांगुर्डे, उमेश चव्हाण आदी सहभागी झाले होते.