---इन्फो---
या भागात उत्स्फुर्त प्रतिसाद
शहरातील शालिमार, मेनरोड, शिवाजीरोड, नेहरु उद्यान परिसर, एम.जी.रोड, भद्रकाली, सरस्वती लेन, दहीपुल, बोहरपट्टी, सराफ बाजार या भागात सर्वत्र व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवलेली होती. तसेच हुंडीवाला लेन, कानडे मारुती लेन, टांकसाळ लेन, गुळ बाजार, नेहरु चौक, दुध बाजार, भांडी बाजार या भागात जवळपास सर्वच दुकाने बंद दिसून आली. केवळ मेडिकल, किराणा माल विक्री, मसाले विक्री, दुग्धालय, मिठाईची दुकाने, खाद्यगृह, उपहारगृह नियमितपणे सुरु होती.
---इन्फो---
रविवार कारंजा चौक गजबजलेला
रविवार कारंजा चौक परिसर नेहमीप्रमाणे शनिवारी (दि.२०) दुपारनंतर संध्याकाळपर्यंत गजबजलेला पहावयास मिळाला. या चौकात बोहरपट्टीच्या वळणापासून तर थेट यशवंत व्यायामशाळेपर्यंत फळविक्रेते, भाजीविक्रेते, खेळणीविक्रेत्यांसह धान्य विक्रेत्यांनी रस्त्याच्याकडेला ठिय्या दिलेला होता. यामुळे या चौकात वर्दळ कायम दिसून आली. बहुतांश विक्रेते हे ग्राहकांशी व्यवहार करताना तोंडावरील मास्क हनुवटीपर्यंत खाली घेतच संवाद साधताना दिसून आले.
----
नाशिककरांनी दिवसभर निर्बंधांचे तंतोतंत पालन केले. मात्र, सायंकाळी उपनगरांत मोठी वर्दळ दिसून आली. खरेदी, हॉटेलिंगसाठी संध्याकाळी पाच वाजेपासून बाहेर पडलेल्या नाशिककरांमुळे रस्त्यांवर वाहनांची संख्येतही अचानकपणे वाढ झाल्याचे जाणवले. जुने नाशिकसह उपनगरांतील भाजीमंडईत सामाजिक अंतराचे तीन तेरा वाजलेले दिसून आले.करोना संसर्गाचा धोका पुन्हा वाढू लागल्याने शनिवारी-रविवारी संपूर्ण आस्थापना बंद ठेवण्याच्या आदेशांनुसार शनिवारी हॉटेलिंग, कॅफेत मित्रांसोबतच्या गप्पा, खवय्येगिरी यासह भाजी, किराणा, दूध खरेदीसाठी नाशिककर मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते. त्यामुळे दिवसभर निर्मनुष्य असलेल्या रस्त्यांवर सायंकाळी सहानंतर वर्दळ वाढल्याचे चित्र बघावयास मिळाले.