नाशिक : नेत्याप्रती आदरभाव असतोच, कित्येकांची तर देवाइतकीच नेत्यावरही श्रद्धा असते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती असलेल्या आदरामुळे नाशिकमधील एक सामान्य शिवसैनिक विजय गवारे दरवर्षी त्यांचे चित्र स्वत:च्या रक्ताने तयार करून त्यांना भेट देण्याचा अनोखा उपक्रम राबवित आहे. विशेष म्हणजे ठाकरे यांच्या निधनानंतरही त्यांचा उपक्रम कायम असून, हा आदर व्यक्त करण्याच्या प्रयोगाचा रौप्य महोत्सव पूर्ण झाला आहे. विजय गवारे हे महापालिकेच्या सेवेत आहेत. ते मूळचे मुंबईचे. तेव्हापासूनच ते शिवसैनिक आहेत. रोजगारासाठी नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर महापालिकेत भरती झाले. सध्या ते म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष आहे. बालपणापासूनच शिवसेनेविषयी आकर्षण असलेल्या गवारे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस अभिनव पद्धतीने साजरा करण्यासाठी स्वत:च्या रक्ताने त्यांचे चित्र कागदावर रेखाटून त्यांच्याविषयी आदर व्यक्त करणारा मजकूर लिहिण्याचा प्रयोग सर्व प्रथम १९९२ मध्ये राबविला. शिवसेना प्रमुखांचा वाढदिवस म्हणजे दरवर्षी २३ जानेवारीस त्यांना अशाप्रकारचे चित्रभेट पाठविणाºया गवारे यांनी कधी कधी स्वहस्ते हे चित्र भेट दिले आहे. बाळासाहेबांची प्रत्यक्ष भेट आणि त्यांनी केलेले कौतुक स्मरणात असल्याचे गवारे सांगतात. मूळ मुंबईकर असलेल्या गवारे नाशिकमध्ये स्थायिक असले तरी त्यांच्या आईकडे ते चित्र पाठवितात, त्या मातोश्रीवर जाऊन चित्र भेट देतात. २०१४ मध्ये शिवसेनाप्रमुखांचे निधन झाले. परंतु गवारे यांची भक्ती कमी झालेली नाही. दरवर्षी ते रक्ताने चित्र काढून पाठवत असतात. मुळात त्यांच्या लेखी शिवसेनाप्रमुख अमर असल्याने भावनिकदृष्ट्या ते समर्थन करतात.
रक्ताने शिवसेनाप्रमुखांचे चित्र रेखाटण्याची सिल्व्हर ज्युबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:55 AM