नाशिक : एकीकडे सिंहस्थ कुंभपर्वात विवाह मुहूर्त नसल्याचे सांगितले जात असताना, कुंभमेळ्याचे मूळ स्थान असलेल्या नाशिकमध्ये मात्र या काळातही लग्नांचा बार नेहमीप्रमाणे धूमधडाक्यात उडणार आहे. शहरातील बहुतांश मंगल कार्यालयांत जानेवारीपर्यंतच्या लग्नतारखांची आतापासूनच नोंदणी पूर्ण झाली असून, विवाहांबाबत कुंभपर्वाचे बंधन लोकांनी जणू झुगारून दिल्याचेच चित्र आहे. दर बारा वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात गुरू ग्रह हा सिंह राशीत प्रवेश करतो. त्याचा या राशीत तेरा महिने मुक्काम राहणार आहे. या कालावधीत विवाह व अन्य मंगलकार्ये करता येणार नाहीत, असा दावा काही ज्योतिषतज्ज्ञांनी केला होता. त्यानुसार १४ जुलै २०१५ ते ११ आॅगस्ट २०१६ या कालावधीत विवाह होऊ शकणार नसल्याचे बोलले जात होते. याउलट काही अभ्यासकांनी मात्र ठराविक प्रदेशांमध्ये या काळातही मंगलकार्ये होऊ शकतील, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे लोकांमध्ये याबाबत चांगलाच गोंधळ होता. दरम्यान, दाते पंचांगात मात्र प्रतिवर्षीप्रमाणेच विवाह मुहूर्त दिले असल्याने आणि बहुतांश लोक या पंचांगाचाच आधार घेत असल्याने त्यांनी लग्नकार्यासाठी सिंहस्थ पर्व वर्ज्य मानले नसल्याचे चित्र आहे. शहरातील प्रमुख मंगल कार्यालये, लॉन्सच्या येत्या जानेवारीपर्यंतच्या तारखा बुक झाल्या आहेत. येत्या मे महिन्यातील तीन आठवडे व संपूर्ण जून महिनाभर अस्त असल्याने विवाह बंद राहणार आहेत. त्यामुळे नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीतच बहुतांश विवाह पार पडणार असल्याची चिन्हे आहेत. यंदाच्या वर्षी विवाहांवर दुष्काळाचा काहीसा परिणाम जाणवणार असला, तरी कुंभपर्वाचा मात्र किंचितही परिणाम झाला नसल्याचे लॉन्सचालकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
सिंहस्थ पर्वातही उडणार लग्नांचा बार !
By admin | Published: November 15, 2015 10:59 PM