नाशिक : राज्यात पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शासनाचा संपूर्ण फोकस आता दुष्काळी भागाकडे केंद्रित झाला आहे. सरकारचा प्राधान्यक्रम बदलल्याने सिंहस्थ कुंभमेळ्याचे उर्वरित अनुदान रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, नाशिक मनपाला आतापावेतो ४८७ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून उपलब्ध झाला असून, उर्वरित २०२ कोटी रुपयांची प्रतीक्षा लागून राहिली आहे. राज्यात पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळाची दाहकता आता जाणवू लागली आहे. दुष्काळाच्या मुद्द्यावरून विरोधकही राज्य सरकारला कोंडीत पकडण्याची संधी साधत आहेत. दुष्काळग्रस्तांना मदत कमी पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देत आहेत. दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी आता राज्य सरकार सरसावले आहे. नाशिकला सुरू असलेल्या कुंभमेळ्याकरिता आराखड्यानुसार देण्यात येणारे अनुदान महिनाभरापासून वितरित होऊ शकलेले नाही. आता दुष्काळसदृश परिस्थितीमुळे सदर उर्वरित अनुदान रखडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता सिंहस्थाचा पर्वणीकाळ २५ सप्टेंबरला संपुष्टात येणार आहे. सिंहस्थ विषयक बव्हंशी कामे पूर्णत्वाला गेलेली आहेत. त्यामुळे सिंहस्थावरील फोकस आता दुष्काळी भागाकडे वळाला असल्याने यापुढील सिंहस्थ अनुदानाला विलंब लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
दुष्काळामुळे रखडणार सिंहस्थ अनुदान
By admin | Published: September 07, 2015 11:29 PM