नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात येणाऱ्या लाखो भाविकांच्या वाहतुकीसाठी परिवहन महामंडळाने तयारी केली असतानाच, खासगी वाहतूकदारांनीही त्यांची तयारी करीत बाहेरील जिल्ह्यांमधून भाविकांची वाहतूक करण्यासाठी नियोजन करण्यास प्रारंभ केला आहे. बाह्य वाहनतळांवरून भाविकांना स्वगृही पोहोचविण्यासाठी विविध प्रकारची वाहने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. इतर राज्यांमधून आणि महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यांमधून शाहीस्नानाच्या तारखा व त्या तारखांना लागूनच नाशिक दर्शन असे नियोजन करणाऱ्या कंपन्यांनी भाविकांना राहण्याचे पॅकेजही उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू केली आहे. सिंहस्थात नाशिकमध्ये निवासाचे ठिकाण उपलब्ध होत नाही आणि शहरांतर्गत जिल्ह्यात इतरत्र फिरण्याची इच्छा असताना माहिती नसल्याने तेथे फिरता येत नाही. अशी परिस्थिती असलेल्या परराज्यांतील विशेषत: उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व बिहारमधील भाविकांना त्यांच्या राज्यातून घेऊन येणे, कुंभमेळा, शाहीस्नानानंतर नाशिक दर्शन करून पुन्हा त्यांच्या राज्यात नेणे अशा पॅकेजची योजना ट्रॅव्हल कंपन्यांमार्फत आखली जात आहे. यासाठी विविध प्रकारचे पॅकेज देण्याची तयारी वाहतूकदारांना चालविली आहे.
वाहतूकदारांना सिंहस्थाचे वेध
By admin | Published: June 16, 2015 12:04 AM