नाशिक : तोंडावर येऊन ठेपलेल्या नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांबाबत खुद्द मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करून प्रशासनाला एकीकडे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलेले असताना, दुसरीकडे मात्र वर्षानंतर भरणाऱ्या उज्जैन येथील कुंभमेळ्याच्या कामाच्या पाहणीचा घाट अधिकाऱ्यांनी घातल्याने ‘आग रामेश्वरी, तर बंब सोमेश्वरी’ असा प्रकार सुरू झाला आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण जुलै महिन्यात होत असले तरी, या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी दोन वर्षांपासून नियोजन करण्यात आले होते. गेल्या वर्षी यासंदर्भात तयार करण्यात आलेल्या २३०० कोटी रुपये खर्चाच्या आराखड्यास राज्य सरकारने मंजुरीही दिली. त्यानुसार सुमारे दोन हजार कोटी रुपयांची कामे विविध यंत्रणांच्या माध्यमातून केली जात असून, या कामांचा जिल्हा व राज्य पातळीवर वेळोवेळी आढावा व सादरीकरणही करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षते -खालील शिखर समिती, तर मुख्य सचिवांच्या उच्चाधिकार समितीने वेळोवेळी कामांबाबत मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. कुंभमेळ्यासाठी करावयाची अनेक कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण करायची मुदत होती; परंतु नियोजन बारगळल्याने होऊ शकली नाहीत. अशा कामांसाठी एप्रिलअखेर ही अंतिम मुदतही देण्यात आली आहे. कामे मुदतीत पूर्ण व्हावीत यासाठी विभागीय आयुक्त दर मंगळवारी बैठक घेत असून, त्र्यंबकेश्वर येथे कामांची संथ गती पाहता दररोज एक अधिकारी त्र्यंबकला भेट देऊन कामे पूर्ण करण्याचा लकडा लावत आहे. याचाच अर्थ जिल्हा प्रशासनाच्या लेखी सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे पूर्णत्वास येण्याच्या स्थितीत असून, त्याची प्रत्यक्ष उपयुक्तताही दिसू लागली आहे, तर काही तात्पुरती कामे जुलै महिन्याच्या अखेरीस केली जाणार आहेत. त्र्यंबकेश्वर येथे अजूनही कामे घेण्यासाठी ठेकेदार पुढे येत नसल्याने ही कामे वेळेत पूर्ण होण्याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.सिंहस्थ कुंभमेळ्याची बहुतांशी कामे एप्रिलअखेर पूर्ण होतील, असा छातीठोक दावा जिल्हा प्रशासन करत असताना दुसरीकडे उज्जैन येथे २०१७ मध्ये कुंभमेळा भरणार आहे. या तेथील कुंभमेळ्याची अद्याप काही तयारीही सुरू झाल्याची चर्चा नसताना नाशिकच्या अधिकाऱ्यांनी उज्जैन येथील कुंभमेळ्याच्या तयारीचा दौरा आयोजित केला आहे. जर नाशिकच्या कुंभमेळ्याची तयारी पूर्ण झाली असेल, तर उज्जैनची तयारी कशासाठी मार्गदर्शक ठरेल, याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उज्जैनच्या कुंभमेळ्याची तयारी आदर्शवत असे जरी प्रशासनाच्या निदर्र्शनास आले, तर नाशिक-त्र्यंबकमध्ये करण्यात आलेल्या कामांमध्ये ऐनवेळी फेरबदल केले जाणार आहेत, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)
सिंहस्थ तोंडावर, अधिकारी दौऱ्यावर
By admin | Published: April 17, 2015 11:48 PM