जळगाव नेऊर : अनेक शेतकऱ्यांनी इतर पिकांना फाटा देऊन भाजीपाला पिके घेतली. पिकेही जोमात आली. मोठ्या प्रमाणात उत्पादन निघूनही त्यासाठी केलेला खर्चही वसूल न झाल्याने जळगाव नेऊर येथील राजेंद्र शिंदे व संदीप शिंदे या भावंडांवर मोठ्या मेहनतीने लावलेली सिमला मिरची उपटून फेकून देण्याची वेळ आली आहे. सव्वा लाखाचा खर्च करूनही मिरचीला दोन रुपये किलो असा दर मिळाल्याने शिंदे बंधू अक्षरश: हतबल झाले आहेत.
शिंदे बंधूंनी १० जूनला मल्चिंग पेपर अंथरून मिरचीची लागवड केली होती. त्यानंतर तार, बांबू ,रोपे, ड्रिप, मशागत, रोपे बांधणे, रासायनिक खते, लिक्विड खते असा सरासरी सव्वा लाख रुपये खर्च करून उत्पादन सुरू झाले. त्यात पहिलाच मिरचीचा तोडा २०० क्रेट भरून विक्रीसाठी मार्केटला नेले असता, सात हजार रुपये आले. त्यात दोन हजार गाडीभाडे, एक हजार रुपये तोडणी मजुरी, इतर खर्च वजा जाता तीन हजार रुपये शिल्लक राहिले, दुसऱ्या वेळेस दोन रुपये किलोला भाव मिळाल्याने तशीच गाडी मार्केटवरून परत आणून रस्त्यावर फेकून दिली. केलेला खर्चही वसूल होत नसल्याने व केलेला खर्चही वसूल होणार नसल्याने मंगळवारी एक एकर सिमला मिरची उपटण्याचा निर्णय घेतला.
प्रतिक्रिया
कर्ज काढून मोठ्या मेहनतीने सिमला मिरचीचे पीक उभे केले. रासायनिक खते, लिक्विड खते देऊन निगा राखून चांगले उत्पादन काढले. पण, दोन रुपये किलोला मिळालेला भाव पाहता यातून खर्चही वसूल होणार नसल्याने केलेला सव्वा लाख रुपये खर्च वाया गेला आहे. त्यामुळे एक एकरातील पीक उपटून टाकण्याचा आम्ही निर्णय नाइलाजाने घेतला.
- संदीप शिंदे, सिमला मिरची
उत्पादक, जळगाव नेऊर
फोटो.. जळगाव नेऊर येथील राजेंद्र शिंदे व संदीप शिंदे या बंधूंनी उपटून फेकलेले सिमला मिरचीचे पीक.
150921\img-20210915-wa0421.jpg
जळगाव नेऊर येथील फेकून दिलेले मिरचीचे पिक