नाशिक : भाजपची देशात सत्ता आली तर ते राज्यघटना बदलतील असे सातत्याने सांगितले जाते, मात्र सर्वप्रथम राज्यघटना बदलण्याचे पाप कॉँग्रेसनेच केले. राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध असतानादेखील जम्मू आणि काश्मीरसाठी ३७० कलम घुसवण्यात आले होते आणि तेच आता आमच्यावर घटना बदलण्याची भीती घालत आहेत, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.नाशिक पश्चिम मतदारसंघात पवननगर मैदानात भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सोमवारी (दि.१४) योगी आदित्यनाथ यांची सभा संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते.भारतीय राज्यघटनेत जम्मू आणि काश्मीरला वेगळा दर्जा देणारे कलम ३७० समाविष्ट केले तर त्यामुळे त्या राज्यात अस्थिरता माजेल, यामुळे असा विशेष दर्जा देऊ नये असे राज्य घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते. मात्र त्यांचा विरोध असताना कॉँग्रेसने हे कलम घुसविले. आता कॉँग्रेसच्या पापाचे परिमार्जन करण्याचे काम पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी केले आहे. त्यामुळे डॉ. आंबेडकर यांच्या अपेक्षांची पूर्तता झाल्याचेदेखील योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.कॉँग्रेस आणि आघाडी सरकारची तब्बल पंधरा वर्षे राज्यात सत्ता होती. मात्र या कालावधीत भ्रष्टाचाराचे विक्रम प्रस्थापित झाले तसेच घराणेशाही तसेच जातीयवाद वाढला असे सांगून ते म्हणाले की, पूर्वीपासून पाकिस्तानसारख्या राष्टÑाकडून त्यामुळेच अणुबॉम्ब टाकण्याची धमकी देण्यात येत होती, मात्र त्यांना प्रत्युत्तर दिले जात नव्हते. मात्र केंद्र सरकारने आक्रमक भूमिका घेऊन पाकिस्तान नेस्तनाबूत करण्याची धमकी देऊन त्यांचे तोंडच बंद केल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी बोलताना आमदार सीमा हिरे म्हणाल्या पाच वर्षांत सिडकोसाठी सर्वाधिक निधी आणला सिडकोवासीयांची घरे लीजने होती, ती फ्री होल्ड करण्याचा निर्णय करून आणला. तत्कालीन आयुक्तांनी सिडकोत अतिक्रमणे आहेत असे सांगून अतिक्रमणावर बुलडोझर चालविण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण न्यायालयात जाऊन त्याला विरोध केला असे नमूद केले.व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार जगदंबिकापाल, महापौर रंजना भानसी, उमेदवार सीमा हिरे, देवयानी फरांदे, गिरीश पालवे, विजय साने, वसंत गिते,सुनील बागुल आणि पदाधिकारी उपस्थित होते.कॉँग्रेसच्या घोषणा‘मेरा वैभव अमर रहे...’सभेच्या प्रारंभी भारत माता की जय आणि वंदे मातरम् अशा घोषणा देण्यात आल्या. त्याचा संदर्भ घेऊन योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, अशा घोषणा कॉँग्रेस आणि राष्टÑवादीच्या व्यासपीठावर दिल्या जात नाहीत. त्यांच्या व्यासपीठावर मेरा वैभव अमर रहे एवढ्याच घोषणा दिल्या जातात. गेल्या चार महिन्यांपासून कॉँग्रेसकडे नेता नाही, नेतृत्वहीन पक्ष ज्याला नेता नीती आणि नियत नाही, असेही ते म्हणाले.विकासाला साथ देण्याचा विश्वासया मतदारसंघातील उमेदवार सीमा हिरे यांनी मतदारसंघाचा निरंतर विकास केला आणि मोठ्या योजना येथे आणल्या. त्यामुळेच त्यांना मतदारांनी साथ दिली आणि यापुढेदेखील साथ देतील, असा विश्वास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला.
राज्यघटनेत बदल करण्याचे पाप कॉँग्रेसकडूनच: योगी आदित्यनाथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 1:35 AM
भाजपची देशात सत्ता आली तर ते राज्यघटना बदलतील असे सातत्याने सांगितले जाते, मात्र सर्वप्रथम राज्यघटना बदलण्याचे पाप कॉँग्रेसनेच केले. राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध असतानादेखील जम्मू आणि काश्मीरसाठी ३७० कलम घुसवण्यात आले होते आणि तेच आता आमच्यावर घटना बदलण्याची भीती घालत आहेत, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.
ठळक मुद्दे आघाडीच्या काळात भ्रष्टाचाराचे विक्रम