नाशिक : युवा गायक समिहन कशाळकर यांच्या अभिजात शास्त्रीय गायनासह पंडित सपन चौधरी यांच्या एकल तबलावादनाचा श्रवणानंद नाशिककर रसिकांना शनिवारी (दि.८) अनुभवायला मिळाला.शंकराचार्य संकुलातील डॉ. कुर्तकोटी सभागृहात शनिवारी (दि.८) भूपाली क्रिएटिव्हजतर्फे पंडित दिनकर कैकिणी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोनदिवसीय ‘दिनरंग स्मृती’ महोत्सवाच दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले. संगीत महोत्सवातील पहिल्याच मैफलीच्या पूर्वार्धात नाशिककरांना ग्वाल्हेर घराण्याचे तरुण गायक समिहन कशाळकर यांच्या अभिजात शास्त्रीय गायनाचा आविष्कार ऐकण्याची अनुभूती मिळाली. कशाळकर यांनी श्री रागातील बंदीश सादर केली. तिलवाडा तालातील विलंबित बोल वारी जाऊ दे बंदिशीसह झपतालातील हरिके चरण कमल रचनेला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.पंडित दिनकर कैकिणी रचित बसंत रागातील कान्हा रंगवा न डारो बंदिशीने श्रोते भारावले. त्यांना तबल्यावर रोहित मुजूमदार, संवादिनीवर तन्मय देवचक्के यांनी, तर तानपुऱ्यावर आरोह ओक आणि संस्कार जानोरकर यांनी साथसंगत केली, तर उत्तरार्धात पंडित सपन चौधरी यांची सोलो तबलावादनाची मैफल रंगली. त्यांनी लखनौ शैलीत कायदा, केला, गत, पढंत, चक्रदार, पेशकार पेश करून श्रोत्यांची मने जिंकली. दरम्यान, शिवानी दसककर यांना पंडित गजानन जोशी स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या अनुपस्थितीत सासू उषा दसककर यांनी पुरस्कार स्वीकारला, तर पंडित जयंत नाईक यांना पंडित नारायण जोशी स्मृती पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन शिल्पा देशमुख यांनी केले.
गायन, तबलावादनाचा श्रवणानंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 11:21 PM
युवा गायक समिहन कशाळकर यांच्या अभिजात शास्त्रीय गायनासह पंडित सपन चौधरी यांच्या एकल तबलावादनाचा श्रवणानंद नाशिककर रसिकांना शनिवारी (दि.८) अनुभवायला मिळाला.
ठळक मुद्देदिनरंग संगीत महोत्सव । दसककर, नाईक यांना पुरस्कार प्रदान