मालेगाव : थंडी वाढू लागली असून शहरातील क्रीडा संकुलावर व्यायामपटूंची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. व्यायाम आरोग्यासाठी पोषक असल्याने काही लोक खारीक, खोबरे, बदाम असे पौष्टिक सुका मेवा खरेदी करत आहेत. नागरिक भल्या सकाळी चालण्यासाठी नामपूर रस्त्यावर तसेच पोलीस कवायत मैदानावर व्यायाम करण्यासाठी येत आहेत.
--------------------------------------------------------------------------------------------------------
थंडीमुळे रस्ते रात्री निर्मनुष्य
मालेगाव: शहर परिसरात थंडीचा जोर वाढल्यामुळे रात्री तसेच भल्या पहाटे कामानिमित्त निघणाऱ्या लोकांची संख्या घटली असून गारठ्यापासून बचावासाठी शेकोटीचा आधार नागरिक घेत आहेत. त्यामुळे रात्री आठ वाजेनंतर गर्दी ओसरत असून रस्ते निर्मनुष्य होत असल्याने रात्री अघोषित संचारबंदीचे स्वरूप रस्त्यांना येत आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------
वाहक चालकांनाही मास्क सक्ती करा
मालेगाव: शहरात मोठ्या प्रमाणात रिक्षा, टॅक्सीसह वाहने धावत असून वाहनचालक तोंडाला मास्क लावत नसल्याचे दिसून येते. मास्क न लावता रिक्षात प्रवाशांना बसविणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई करावी, प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतली जावी. रिक्षांसह प्रवासी वाहने सॅनेटाईज केली जात नसल्याची तक्रार असून सर्वच वाहनचालकांना मास्क लावण्याची सक्ती करण्यात यावी.
----------------------------------------------------------------------------------------------------------उड्डाण पुलाला अतिक्रमणांचा विळखा
मालेगाव: शहरातील नवीन बसस्थानकाजवळ बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचे काम अपूर्णावस्थेत असून त्या आधीच पुलाजवळ अतिक्रमणांनी वेढा घालण्यास सुरुवात केली आहे. काहींनी तर पुलाखाली चक्क खुर्च्या टाकून हॉटेल थाटले असून चहा पिण्यासाठी हॉटेलमध्ये बसणाऱ्या लोकांची गर्दी होऊ लागली आहे. पुलाजवळील वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढून पुलाचे काम लवकर पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------येसगाव-चंदनपुरी रस्ता दुरुस्तीची मागणी
मालेगाव: तालुक्यातील चंदनपुरी-येसगाव रस्त्याची दुर्दशा झाली असून संबंधितांनी रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना सर्कस करीत वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे अनेकांना मणक्याचे विकार जडले आहेत. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचून डांबर गायब झाले आहे. खड्डे चुकविताना अनेक अपघातही झाले आहेत.