पंचवटी : मालवाहतूक करणारी दोन वेगवेगळी वाहने एकाच क्रमांकाची नंबरप्लेट लावून व्यावसाय करीत असल्याचा धकादायक प्रकार आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर शुक्रवारी (दि.१९) आला आहे. एका वाहनाचे कर्जाचे हप्ते थकल्याने कर्जफेड टाळण्यासाठी संबधितांनी अशी बनवाबनवी केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली असून दोन्ही वाहने शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेत आडगाव पोलीस ठाण्यात जमा केल्या आहेत.
नांदूर नाका परिसरात शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांना शुक्रवारी (दि.१९) सायंकाळी वाहनांच्या तपासणीदरम्यान दोन वेगवेगळ्या पीक अप वाहनांना एमएच १५ जी व्ही ६७२४ या एकाच क्रमांकाच्या नंबर प्लेट असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांना संबधित वाहनांविषयी संशय निर्माण झाल्याने त्यांनी दोन्ही वाहने ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यातून केवळ वाहन खरेदीसाठी अर्थसाहाय्य करणाऱ्या कंपनीकडे वाहनाचे हप्ते थकल्याने कंपनीकडून वाहन जप्तीची कारवाई टाळण्यासाठी संबंधित वाहन चालकांने नातेवाईकाकडे असलेल्या दुसऱ्या सारख्याच वाहनाचा क्रमांक असलेली नंबर प्लेेट स्वतःच्या वाहनाला लावून वापर केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले. ही दोन्ही वाहने निफाड तालुक्यातील असून मूळ वाहन क्रमांक वापरणारा व क्रमांक बदलून वाहन चालविणारा चालक हे एकमेकाचे नातेवाईक असल्याने पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेत आडगाव पोलीस ठाण्यात जमा केली आहेत. दरम्यान, एकाच क्रमांकाच्या दोन पिकअप आढळून आल्याने प्रादेशिक परिवहन विभागाकडून सविस्तर माहिती घेऊन संबंधित दोषी आढळणाऱ्या वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी सांगितले.
===Photopath===
190321\19nsk_33_19032021_13.jpg
===Caption===
नांदूर नाका परिसरात वाहतूक पोलिसांनी पकडलेली एकाच क्रमांकाची नंबरप्लेट असलेली दोन मालवाहू वाहने