सिन्नर : राज्य परिवहन महामंडळाच्या इंटक संघटनेच्या चालक व वाहकांनी चक्का जाम आंदोलनात सहभाग घेतल्याने सिन्नर आगाराची सेवा पूर्णपणे कोलमडली. इतर संघटनांनीही त्यास पाठिंबा दिल्याने आंदोलनाचा मोठा परिणाम दिसून आला. त्यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. दरम्यान, या संपामुळे खासगी वाहतूक तेजीत असल्याचे दिसून आले.२५ टक्के पगारवाढ व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स कॉँग्रेस (इंटक) ने बेमुदत संपाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपात सिन्नर आगाराच्या जवळपास सर्वच संघटना सहभागी झाल्याचे दिसून आले. सकाळी ९ वाजेपर्यंत काही प्रमाणात सिन्नर आगाराच्या बसेस सुरू होत्या. त्यानंतर इतर संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा दिल्याने बससेवा पूर्णपणे बंद झाली होती. ग्रामीण भागातून सकाळी महाविद्यालयात आलेल्या विद्यार्थ्यांचे घरी जाण्यासाठी हाल झाले. सकाळी बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होती. त्यानंतर दुपारी बसस्थानकात शुकशुकाट दिसून आला. प्रवाशांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला. खासगी वाहतूकदारांनी प्रवासभाडे वाढविल्याने प्रवाशांच्या खिशाला झळ बसल्याचे दिसून आले. सिन्नर आगारात सर्वच्या सर्व ७६ बसेस जमा करण्यात आल्या होत्या. दुसऱ्या आगाराच्या बसेस स्थानकाबाहेरून जात होत्या. त्यामुुळे प्रवाशांची धावपळ उडत होती. येथे बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचे दुपारी दिसून येत होते.
सिन्नर आगाराची सेवा कोलमडली
By admin | Published: December 17, 2015 10:38 PM