निफाड : गेल्या एक वर्षापासून बंद असलेली सिन्नर-चांदवड ही बस पुन्हा सुरू करावी, अशी मागणी येथील प्रवाशांनी के ली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून सिन्नर- चांदवड ही बस प्रवाशांची सेवा करीत होती. सिन्नर, पिंपळगाव, निपाणी, सायखेडा, चांदोरी, कसबे सुकेणे, भाऊसाहेबनगर, कुंदेवाडीमार्गे ही बस प्रवाशांनी भरून निफाड येथे सव्वादहाच्या दरम्यान येत होती. ही बस निफाडहून उगाव, वनसगावमार्गे चांदवडकडे रवाना होत होती. त्यानंतर चांदवडहून ही बस माघारी पावणेदोन वाजता निफाडला येऊन सिन्नरकडे रवाना होत असे. अनेक वर्षे या बसने प्रवाशांची सेवा केली. महामंडळाला यातून चांगले उत्पन्नही मिळत होते. परंतु मागील वर्षी गोदावरीला पूर आला, त्यात सायखेडा येथील जुना जीर्ण झालेल्या पुलाला गंभीर धोका निर्माण झाल्याने या पुलावरून जड वाहने नेण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने बंदी घातली. तसे पत्र या विभागाने पोलीस प्रशासन व एसटी महामंडळाला दिले. त्यानंतर महामंडळाची एकही बस गेल्या एक वर्षात या पुलावरून आजपर्यंत नेण्यात आली नाही. याच नियमामुळे महामंडळाने सिन्नर-चांदवड ही बस रद्द करण्यात आली. ही बस बंद होऊन वर्ष उलटले तरी कोणत्याही राजकीय नेतृत्वाने याची दखल घेतली नाही. ही बस रद्द झाल्याने निफाड व परिसरातून सिन्नर, चांदवडकडे जाणाºया प्रवाशांची गैरसोय होत आहे.मागील वर्षी सायखेडा येथील हा पूल धोकादायक झाल्याने प्रशासनाने कडक आदेश दिल्यानंतर नव्याचे नऊ दिवस सायखेडा पोलिसांनी या पुलावरून जड वाहतूक बंद केली, त्यानंतर मात्र येथील पोलीस बंदोबस्त काढून घेतला. गेल्या एक वर्षापासून या पुलावरून बिनधास्तपणे जड वाहतूक चालू आहे. एसटी महामंडळाने मात्र प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करीत गेल्या एक वर्षात एकही बस या सायखेडा पुलावरून जाऊ दिली नाही. त्याचाच एक भाग म्हणून सिन्नर-निफाड बस बंद करण्यात आली. नाशिकहून ज्या बसेस सायखेडा येथे येतात, त्या सर्व बसेस या पुलाच्या अलीकडे नदीकिनारी असलेल्या वीट भट्ट्यांजवळ थांबविल्या जातात. प्रवासी या ठिकाणाहून नाशिकला ये- जा करीत असतात. जर एसटी महामंडळाने या पुलावरून वर्षभरात एकही बस येऊ दिली नाही, तर मग या पुलावरून खासगी जड वाहतूक सर्रासपणे केली जातेच कशी? एसटी महामंडळ जर हा नियम पाळते, तर तोच नियम सायखेडा पोलीस जड वाहनांना का लागू करीत नाही? असा सवाल या मार्गावर नित्याने प्रवास करणारे प्रवासी विचारत आहे. निफाडचे प्रवासी विविध बसेसच्या मागणीसाठी सातत्याने मागण्या करीत असतात. निफाड रेल्वेस्थानक येथे विशिष्ट रेल्वे थांबवाव्या यासाठी निफाडचे रेल्वे प्रवासी मागण्या करीत असतात परंतु याप्रश्नी राजकीय नेते कुठलाही उत्साह दाखवित नसल्याने निफाडकर नागरिकांत तीव्र नाराजी पसरली असून, ते संभ्रमावस्थेत आहेत.
सिन्नर-चांदवड बस वर्षभरापासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 11:37 PM