सिन्नर; तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येने चारशेचा टप्पा पार केल्याने चिंता वाढली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासन खडबडून जागे झाले. मंगळवारी व्यापाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून येत्या ४ आॅगस्ट पर्यंत सिन्नर शहर व उपनगरे संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला.उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार राहूल कोताडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारीही उपस्थित होते. शहर व तालुक्यात रुग्ण संख्या भीतीदायक पद्धतीने वाढत असल्याने लॉकडाऊन ची गरज व्यापारी असोसिएशनने व्यक्त केली होती. मात्र, शासनाची भूमिका अनलॉक ची असल्याने प्रशासनाने या निर्णयाचे समर्थन केले नव्हते. तथापि, सोमवारी सायंकाळी एकाच दिवसात उच्चांकी 63 रुग्ण आढळल्याने सर्वांची चिंता वाढली. आमदार माणिकराव कोकाटे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्यानंतर अधिकारी सतर्क झाले. मंगळवारी व्यापारी प्रतिनिधींची तातडीची बैठक बोलावून ४ आॅगस्ट पर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी पठारे व तहसीलदार राहुल कोताडे यांनी केले. नगराध्यक्ष किरण डगळे तसेच असोसिएशनच्या वतीने मनोज भगत, मनोज भंडारी, सागर गुजर, नामदेव लोणारे, राजेंद्र देशपांडे, कांताराम यांनी भूमिका मांडली व प्रशासनाच्या निर्णयास पाठिंबा दिला. बंदची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी पोलीस दल गस्त घालणार आहेत.
सिन्नर शहर आणि उपनगरे प्रतिबंधित क्षेत्र घोषीत वाढती रुग्णसंख्या चिंताजनक: नियमांची कडक अमंलबजावणी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 5:45 PM