सिन्नर : विनयभंगाच्या गुन्ह्यात संशयित म्हणून अटक करण्यात आलेल्या २१ वर्षीय युवकाने येथील पोलीस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. यानंतर नातेवाइकांनी पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली होती.सोन्या ऊर्फ डिचक दौलत जाधव (२१) रा. सिन्नर असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी संशयित म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर शनिवारी दुपारी ३ वाजून १९ मिनिटांनी त्यास अटक करण्यात आली. त्यानंतर सुमारे अर्धा तासातच त्याने कोठडीत असलेल्या खिडकीला कापडी फडक्याने (चिंधींने) गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना उघडकीस आल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी पत्रकारांना दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर अधीक्षक विशाल गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी माधव पडिले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांच्यासह एसआरपीची तुकडी, एमआयडीसी व वावी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा सिन्नर पोलीस ठाण्यात हजर झाला होता. पोलीस ठाण्यासमोर जोशीवाडीतील नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. प्रांताधिकारी महेश पाटील यांच्या उपस्थितीत पोलीस कोठडीत पंचनामा करण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती अपर अधीक्षक विशाल गायकवाड यांनी दिली. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात आत्महत्त्याची नोंद करण्याचे काम सुरु होते. या घटनेचा तपास सीआयडीमार्फत केला जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.नातेवाइकांचा आरोपमयत सोन्या ऊर्फ डिचक जाधव यास खोट्या गुन्हांमध्ये अडकवण्यात आल्याचा आरोप यावेळी उपस्थितीत नातेवाइकांनी केला. यापूर्वीही त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यातून तो निर्दोष सुटला होता. मात्र त्यास वर्षभर तुरुंगात राहावे लागले होते असे नातेवाइकांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपूर्वीही तलवार बाळगल्याप्रकरणी त्याला गोवण्यात आल्याचा आरोप नातेवाइकांनी यावेळी पत्रकारांसमोर केला.
सिन्नरला पोलीस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 1:37 AM