सिन्नर : तालुक्यातील धोंडवीरनगर शिवारात जुन्या दापूर रोडवरील शिंदे मळा परिसरातील बंधाऱ्यावर असलेल्या सुमारे ३५ ते ४० झाडांची अज्ञात व्यक्तीने विनापरवाना कत्तल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता वृक्षतोड करणाऱ्या ठेकेदाराच्या माणसांनी इलेक्ट्रिक कटर मशीन घेऊन पळ काढला. तर मशीनसाठी जोडलेली केबल वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागली. धोंडवीरनगरच्या शिंदे मळ्याजवळील बंधाऱ्यावरील काटेरी बाभळीचे, कडूनिंबाचे आणि शिसवाच्या काही झाडांची बिनबोभाटपणे कत्तल सुरू असल्याची माहिती अज्ञात व्यक्तीने फोन करून वनविभागाचे वनरक्षक तुकाराम डावरे यांना दिली. त्यांनी या भागात जाऊन पाहणी केली असता काही व्यक्ती झाडांची बेसुमार कत्तल करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना हटकताच इलेक्ट्रिक कटर मशीन घेऊन त्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला. दरम्यान, इलेक्ट्रिक कटर मशीनसाठी लावलेली केबल मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली.
सिन्नरला विना परवानगी ३५ ते ४० वृक्षांची तोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:14 AM