लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : यावर्षी उशिरा आगमन झालेल्या वरुणराजाने सिन्नर तालुक्याच्या पश्चिम डोंगराळ भागात गेल्या आठवड्याभरापासून मुक्काम ठोकल्याने तालुक्यातील महत्त्वाची धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तालुक्यातील सर्वात मोठे भोजापूर धरण ९५ टक्के भरले आहे. शहरालगत असणारे सरदवाडी धरण, पश्चिम पट्ट्यातील कोनांबे, ठाणगावजवळील उंबरदरी धरण ओसंडून वाहत असल्याने तालुक्यात समाधानकारक वातावरण आहे. गेल्या आठवड्यापासून सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे सर्वप्रथम बोरखिंड धरण ओव्हरफ्लो झाले. त्यापाठोपाठ कोनांबे, उंबरदरी धरण भरले आहे. त्यामुळे म्हाळुंगी व देव नदीला पूर आल्याचे चित्र आहे. रविवारी रात्री सिन्नरजवळील सरदवाडी धरण भरले. म्हाळुंगीला पूर आल्याने तालुक्यातील सर्वात मोठे भोजापूर धरण भरण्याच्या मार्गावर आहे. भोजापूर धरण सुमारे ९५ टक्के भरले असून, सोमवारी रात्री ते ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस होत असताना पूर्वभागात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. पूर्वभागातील नद्यांना व ओढ्यांना अद्याप पाणी नसले तरी पश्चिम भागातून येणाऱ्या पूरपाण्यामुळे देव नदी प्रवाहित झाली आहे. सरदवाडी ‘ओव्हरफ्लो’सरदवाडी : पश्चिम पट्ट्यात सुरू असलेल्या पावसामुळे शिव नदी प्रवाहित झाल्याने शहराजवळील सरदवाडी धरण रविवारी रात्री भरले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून संततधार असल्याने सरदवाडी धरणही भरले आहे. उन्हाळ्यात कोरडेठाक झालेल्या सरदवाडी धरणात गेल्या आठ दिवसांपासून पाण्याची आवक सुरू झाली होती. त्यातच गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपीनंतर शनिवारपासून पावसाने जोर पकडला होता. जामगाव, पास्ते, खापराळेसह शिव नदीच्या उगम क्षेत्रात कोसळलेल्या धो धो पावसामुळे शिव नदी प्रवाहित होऊन धरण भरले. शिव नदीसह सरदवाडी धरणात येणाऱ्या चिखली, राणीखाण, बैलाचे रान या प्रमुख नाल्यांसह सर्व लहान-मोठे ओढेही वाहत असल्याचे चित्र होते. देव नदीवर कुंदेवाडी, मुसळगाव, खोपडी, देवपूर, कीर्तांगळी येथील बंधारे भरत देवनदी सोमवारी पहाटे वडांगळी येथे पोहचली. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला आहे.गेल्या अनेक वर्षात दुशिंगपूर व फुलेनगर या बंधाऱ्यात पाणी आलेले नाही. यावर्षी लवकरच भोजापूर धरण ओव्हरफ्लो होत असून, पावसाळ्यात कालव्यांद्वारे या बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडल्यास पूर्वभागातील पाणीटंचाई कमी होईल. पूर कालव्यांद्वारे भोजापूरचे पाणी या दोन बंधाऱ्यात सोडण्याची मागणी वावीचे माजी सरपंच रामनाथ कर्पे, फुलेनगरचे माजी सरपंच संपत पठाडे, खंडेराव अत्रे, सोमनाथ थोरात, दुशिंगपूरचे कचरू घोटेकर, सुकदेव ढमाले, रामनाथ ढमाले, चंद्रभान गोराणे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
सिन्नरमधील धरणे ‘ओव्हरफ्लो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 1:43 AM