सिन्नर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी छत्रपती संभाजीराजे भोसले व उदयनराजे भोसले यांनी सुरु केलेल्या चळवळीला पाठींबा देण्यासाठी येथे शरद शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली तहसील कार्यालयासमोर एकदिवस लाक्षणिक उपोषण करण्यात आले. तहसील कार्यालयासमोर सकाळी साडेदहा वाजता उपोषणास प्रारंभ करण्यात आला. यावेळी विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह अठरा पगड समाजाच्या कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मराठा आरक्षणाला पाठींबा दर्शविला. कोरोनाचे नियम पाळून सदर आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाने आत्तापर्यंत शांततेच्या मार्गाने ५२ मोर्चे काढले. मात्र सर्वोच्च न्यायालयात आरक्षण न टिकल्याने पुन्हा नव्याने आरक्षण टिकविण्यासाठी उभारण्यात आलेल्या चळवळीला पाठींबा देण्यासाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. राज्य व केंद्र शासनाने एकमेकांना दोष न देता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. उपोषणात शरद शिंदे यांच्यासह दौलत धनगर, संदीप लोंढे, सुनील महाराज, बापू सानप, शिवाजी गुंजाळ, बंडू लहाने, गोरख ढेरिंगे, चिंधू गुंजाळ यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मराठा आरक्षणाच्या चळवळीला पाठींबा देण्यासाठी सिन्नरला उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 5:10 PM